वांबोरी : शेतात खेळता खेळता छोटा मुलगा विहिरीत पडला. त्याचे ओरडणे ऐकून त्याच्या वडिलांनी विहिरीत उडी मारली. घाबरलेल्या मुलाने वडिलांचे पाय घट्ट धरल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. त्याचवेळी त्यांची सून रोहिणी तेथे आली. कोणताही विचार न करता प्रसंगावधान राखून तिने अंगावरील साडीचा दोर करून विहिरीत सोडला. त्याच्या साह्याने छोट्या दिराला आणि नंतर सासर्यांना सुखरूप बाहेर काढले!
गावातील कुक्कडवेढे रस्त्याजवळच्या शेतात ही घटना घडली. रोहिणी वनेश ससाणे ही त्याची नायिका ठरली. या जिगरबाज तरुणीवर गावातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
रोहिणी, तिचा छोटा दीर संतोष बाळू ससाणे (वय १२) व त्याचे वडील बाळू बाजीराव ससाणे (वय ५५) शुक्रवारी शेतात होते. संतोष विहिरीच्या काठावरील लिंबाच्या झाडावर अडकवलेल्या पाइपशी खेळत होता. खेळता खेळता तोल जाऊन तो विहिरीत पडला. पडता पडताच तो मोठ्याने ओरडला. ते ऐकून बाळू ससाणे विहिरीपाशी धावले. गटांगळ्या खाणार्या संतोषला वाचविण्यासाठी त्यांनी विहिरीत उडी मारली. पण घाबरलेल्या संतोषने वडिलांचे पाय घट्ट धरले. त्यामुळे ससाणे यांना काहीच करता येईना. दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. त्याच वेळी तेथे आलेल्या रोहिणीने सासरा व दीर पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे पाहिले. क्षणाचाही विलंब न करता तिने अंगावरील साडी सोडली. तिचे एक टोक विहिरीत सोडले व दुसरे आपल्या हातात धरले. गटांगळ्या खाणारे सासरे बाळू आणि दीर संतोष यांना साडी धरून ठेवण्यास सांगितले. बाळू ससाणे यांनी संतोषच्या कमरेला साडी बांधली.
त्यानंतर रोहिणीने संतोषला वर खेचून घेतले. त्यानंतर साडी तशीच हातात धरून सासरे बाळू यांना वर येण्यास सांगितले. सुनेमुळे प्राण वाचलेल्या बाळू ससाणे यांना विहिरीबाहेर येताच अश्रू अनावर झाले.
* ग्रामपंचायत करणार रोहिणीचा गौरव
ही माहिती समजल्यावर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. रोहिणीच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. सरपंच उदयसिंह पाटील यांनी रोहिणीचे कौतुक करून स्वातंत्र्यदिनी वांबोरी ग्रामपंचायतीमार्फत तिचा गौरव करणार असल्याचे सांगितले.