नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने ४ जुलै रोजी करण्यात आलेल्या शाळाबाह्य बालक सर्वेक्षणामध्ये एकुण १०९७ बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये याकरीता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली, शिक्षण विभागाचे उपआयुक्त अमरिश पटनिगीरे यांच्या नियंत्रणाखाली शिक्षण विभागामार्फत दि. ४ जुलै रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी शाळाबाह्य बालकांच्या नोंदी करण्यात आल्या. या कामामध्ये ४४५० प्रगणकांनी महापालिका क्षेत्रात शाळाबाह्य बालक सर्वेक्षण केले. त्यावर १०४ पर्यवेक्षक आणि ११ क्षेत्रिय अधिकारी व ५ विशेष भरारी पथकांमार्फत नियंत्रण ठेवण्यात आले. सर्वेक्षित बालकांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावून ही नोंदणी करण्यात आली.
या सर्वेक्षणामध्ये नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग लाभावा याकरीता २ जुलै रोजी महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून शाळाबाह्य बालक शोध मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रॅलीप्रसंगी महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही नागरिक सहकार्याचे आवाहन केले होते.
या सर्वेक्षणामध्ये ६ ते १४ वयोगटातील शाळेत कधीच न गेलेली ३०६ बालके तसेच ३३१ बालिका आढळल्या. त्याचप्रमाणे मधेच शाळा सोडलेली २७६ बालके व १८४ बालिका आढळल्या. अशाप्रकारे या सर्वेक्षणात एकुण ५८२ बालके व ५१५ बालिका म्हणजेच एकुण १०९७ बालक शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. यामध्ये ४९ बालके व ३९ बालिका अशाप्रकारे एकुण ८८ विशेष बालके (अपंग) असल्याचे निर्देशनास आले. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार या शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेतले जाऊन त्यांच्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाची दारे खुली केली जाणार आहेत.