मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लेखी आश्वासने देऊनही केंद्रात व राज्यात सत्तेत सहभागी करण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपविषयी मोठी नाराजी आहे, मात्र नाराजी असली तरी भाजपची साथ सोडण्याचा कोणताही विचार नाही, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केले.
रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक सोमवार, दि. ६ जुलै रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये पार पडली. मंत्रिमंडळ व महामंडळामध्ये पक्षाला किमान पाच टक्के वाटा मिळावा, जिल्हा समित्यांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थान
मिळावे, यासाठी कार्यकर्त्यांचा आमच्यावर दबाव आहे. भाजपने दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटून करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणार्या सामाजिक समरसता अभियानाऐवजी सामाजिक समता अभियान राबवण्याची गरज आहे, समरसता शब्दाबद्दल आम्ही नाराज आहोत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहवून पक्षाच्या भावना कळवण्यात येतील, असे आठवले यांनी स्पष्ट केले.
शिवसेना-भाजपने एकत्र लढण्यातच त्यांचा लाभ आहे, हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढल्यावर काय निकाल येतो हे वसई विरार महापालिकेच्या व गोंदियाच्या निवडणूकीत समोर आले आहे, असे ते म्हणाले.आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये शिवसेना व भाजपने मित्रपक्षांना एकत्र घेऊन लढवाव्यात अशी मागणी त्यांनी केली.