सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नेरूळ : ऐरोली येथील शाळेतील फ्रान्शेला वाझ या आठ वर्षीय शालेय विद्यार्थिनीच्या दुर्दैवी घटनेनंतर नवी मुंबईच्या शालेय वर्तुळात शोककळा पसरली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांच्या स्कूल बस सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकवार ऐरणीवर आला असल्यामुळे मनसे महिला सेनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा सौ. रिटाताई गुप्ता व मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे व शिक्षण अधिकारी दत्तात्रय नागरे यांची भेट घेऊन विविध उपाययोजना व मागण्यांचे निवेदन दिले. यात प्रामुख्याने नवी मुंबईतील सर्व स्कूल बसमध्ये सीसीटीव्हीसह जीपीएस यंत्रणा बसविण्याची मागणी प्रामुख्याने मनसेकडून करण्यात आली. यामुळे प्रत्येक विद्यार्थी सुरक्षित स्कूल बस प्रवास करेल असा मुद्दा याप्रसंगी गजानन काळे यांनी मांडला. तसेच या स्कूल बसमध्ये महाराष्ट्र शासनाच्या शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंबंधीच्या स्कूल बस धोरणानुसार महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बस करिता विनियम) नियम, २०११ अन्वये १) १५ वर्षांपूर्वीच्या बसेस मधून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यात येऊ नये. २) स्कूल बसमध्ये वरील बाजूस प्रथमोपचार पेटी आणि आय.एस.आय. मार्क असलेली प्रत्येकी पाच किलो क्षमतेची एबीसी प्रकारची दोन अग्निशामके ठेवणे आवश्यक असेल. त्यापैकी एक चालकाच्या केबिनमध्ये तर दुसरे मागे बसच्या आणीबाणी दरवाजाजवळ असावे. ३) प्रत्येक स्कूल बस मध्ये चालकाशिवाय एक मदतनीस असेल. मुलींच्या स्कूल बस मध्ये महिला मदतनीस असणे आवश्यक आहे. हे मदतनीस मुलांकडे लक्ष देतील आणि बसमधून चढता-उतरताना त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतील. या व इतर सर्वच नियम अटी शर्थींची पूर्तता होते की नाही याबाबत आरटीओने ने विशेष तपासणी मोहीम राबवावी. यासाठी मनसेचे भरारी पथक स्थापन करून ते आरटीओला नियम न पाळणार्या स्कूल बस संदर्भात योग्य ते सहकार्य करेल असे मत मनसे महिला सेना महराष्ट्र उपाध्यक्षा रिटा गुप्ता यांनी या प्रसंगी मांडले.
या मागण्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) आणि शिक्षण अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सीसीटीव्ही व जीपीएस यंत्रणा स्कूल बसमध्ये लावण्याबाबत मुख्याध्यापक पालक, स्कूल-बस मालकांची बैठक आयोजित करू असे आश्वासन दिले. तसेच येत्या १५ दिवसांत सर्व स्कूल बसेसची तपासणी मोहीम राबिवण्यात येईल. प्रत्येक पालकांना महाराष्ट्र शासनाच्या शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंबंधीच्या स्कूल बस धोरणानुसार महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बस करिता विनियम) नियम, २०११ अधिनियम कळावेत यासाठी शाळेच्या प्रवेश करतेक्षणी दर्शनी भागात नियम व अटींचा बोर्डही लावण्याची सक्ती शाळांना करू असेही शिक्षण अधिकारी दत्तात्रय नागरे यांनी शिष्टमंडळास सांगितले.
तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) नियमानुसार शिशु वर्गातील मुलांना जो पर्यंत त्यांचे पालक स्टॉपवर येत नाहीत तोपर्यंत त्याला तेथे सोडता येत नाही. जर पालक आले नाहीत तर संबंधित विद्यार्थ्याला पुन्हा शाळेत सोडण्यात येते. पण ऐरोलीतील घटनेनंतर मात्र प्राथमिक शाळेत शिकणार्या म्हणजे इथल्या तिसरी,चौथीच्या विद्यार्थ्यांना देखील असा नियम घालणे गरजेचे झाले असल्याचे मनसेने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) लक्षात आणून दिले.
नुसतेच आरटीओ अधिकारी व शिक्षण अधिकारी यांना निवेदन देऊन न थांबता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कठोर उपाययोजना कराव्यात यासाठी मनसेचे कार्यकर्ते नवी मुंबईतील सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र देणार आहेत. त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते संदर्भात स्कूल बस मालक यांना भेटून ही सुरक्षेसंदर्भात कोणतीही तडजोड करू नये असेही आवाहन करणार आहोत असेही मनसेने कळविले आहे.
यावेळी या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, विनोद पार्टे, गजानन खबाले, शहर सचिव ऍड.कौस्तुभ मोरे, महिला सेना उपशहर अध्यक्ष डॉ.आरती धुमाळ, सचिव गायत्री शिंदे, सोनिया धानके, आप्पासाहेब कोठूळे, विभाग अध्यक्ष नितीन चव्हाण, सचिन कदम,विक्रांत मालुसरे, अभिलेश दंडवते, धनंजय भोसले, उपविभाग अध्यक्ष विलास घोणे,राजेश ढवळे, नितीन तळेकर,स्वप्नील गाडगे, अभिजित देसाई शाखा अध्यक्ष अजय सुपेकर, नितीन तळेकर, सागर नाईकरे, अनिकेत पाटील, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, भूषण बारवे आणि मोठ्या संख्येनी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.