संजय बोरकर : ९८६९९६६६१४
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची मलप्रक्रिया केंद्रे ही पर्यावरणाचे रक्षण करणारी असून इतरांनीही अनुकरण करावी अशी आहेत असे मत व्यक्त करीत सुप्रिम ऑडिट इन्स्टिट्युशन ऑफ भूतानच्या लेखा अधिकार्यांनी या अभ्यास दौर्यातून बरेच काही नवीन शिकायला मिळाले असे मत व्यक्त केले. महालेखाकार व नियामक, भारत यांच्या वतीने आयोजित ऑडिट ऑफ वेस्ट मॅनेजमेंट या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सुप्रिम ऑडिट इन्स्टिट्युशन ऑफ भूतानच्या १८ वरिष्ठ लेखा परीक्षक अधिकार्यांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या से. ५०, नेरुळ येथील सी-टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत मलप्रक्रिया केंद्राला भेट देऊन तेथील कार्यप्रणालीची प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती घेतली.
सहाय्यक महालेखाकार चंद्रबहाद्दूर गुरुंग यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ लेखा परीक्षक सोनम वँगमो आणि भूतानच्या १८ वरिष्ठ लेखा परीक्षक अधिकार्यांनी प्रथमत: महापालिका मुख्यालयास भेट देऊन तेथील बिल्डींग मॅनेजमेंट यंत्रणेची पाहणी केली तसेच राजमाता जिजाऊ सभागृह, महापौर व आयुक्त यांची दालने, विविध सभागृहे यांना भेटी दिल्या. महापालिका कार्यालयात पर्यावरण रक्षणाबाबत लहान लहान गोष्टींची काळजी घेऊन केलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त करीत ही इमारत म्हणजे आकर्षक वास्तू रचना आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील पर्यावरणपूरक काम असल्याचा अभिप्राय नोंदविला.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या अभ्यासगटाचे महापालिकेच्या वतीने स्वागत केले. याप्रसंगी मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, शहर अभियंता मोहन डगांवकर, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील, मलनि:स्सारण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज पाटील उपस्थित होते.
हा अभ्यासदौरा आमच्यासाठी बरेच काही नवीन शिकविणारा अनुभव होता आणि याचा उपयोग निश्चितच आमच्या देशात होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत या अधिकारी समुहाच्या वतीने मनोगत व्यक्त करताना वरिष्ठ लेखा परीक्षक सोनम वँगमो यांनी नवी मुंबई बेस्ट सिटी असल्याचे म्हटले.
महालेखाकार व नियामक, भारत यांच्या कार्यालयाच्या वतीने आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध उल्लेखनीय प्रकल्पांची नोंद राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात असल्याने लेखा परीक्षकांच्या अभ्यास दौर्यामध्ये मलप्रक्रिया केंद्र पाहणी करण्याचे ठरल्यानंतर स्टेट ऑफ द आर्ट म्हणून अर्थातच नवी मुंबई महानगरपालिकेच्या अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रांला भेट देण्याचे निश्चित करण्यात आले असे या अभ्यास दौर्याचे समन्वयक तथा उप महालेखाकार, मुंबई शिवराज धुप्पे यांनी सांगितले.
शहरातील सांडपाण्यावर सी-टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानाव्दारे प्रक्रिया करणारी एकुण ४२४ द.ल.लि. क्षमतेची ६ मलप्रक्रिया केंद्रे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यान्वित असून अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मानांकित पुरस्कारांनी या प्रणालीचा गौरव झाला आहे. तसेच पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनीही अनेकदा प्रत्यक्ष भेटी देऊन कौतुक केले आहे. येथे सांडपाण्यावर प्रक्रिया करुन शुध्दीकरण करण्यात येत असून या प्रक्रियाकृत पाण्याचा बीओडी ५ पेक्षाही कमी असतो. त्यामुळे पर्यावरणाची हानी टाळली जात असल्याने ही प्रणाली नावाजली जात असून आज भूतानच्या वरिष्ठ लेखा परीक्षक अधिकार्यांनीही प्रत्यक्ष पाहणीअंती या प्रणालीचे मुक्तकंठाने कौतुक केले.