मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांच्या कवितांनी धम्माल उडवून दिल्यानंतर, मंगळवारी दुसर्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका घोषणेनं विधानभवनात गहजब झाला. उद्धव हमारे साथ है, ये अंदर की बात है, असे नारे विरोधकांनी तयार केलेल्या प्रतिसभागृहात घुमले तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
त्याचवेळी, भाजपच्या मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे असल्यास विरोधकांची बाजू घेण्याचे संकेत शिवसेनेनं दिल्यामुळे ‘मानापमाना’सोबतच अधिवेशनात ‘संशयकल्लोळ’ नाट्यही रंगलं आहे. त्यामुळे भाजपची सर्वच बाजूनं कोंडी होताना दिसतेय.
भाजप आणि शिवसेनेतील मतभेद, धुसफूस, हमरीतुमरी आता चव्हाट्यावरच आली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा देऊन सेनेनं टोक गाठलं आहे. स्वाभाविकच, भाजप नेत्यांमध्ये सेनेविरोधात तीव्र संताप आहे. फक्त, अधिवेशनात आपसांत वादावादी नको म्हणून त्यांनी सावध पवित्रा घेतलाय. परंतु, शिवसेनेनं ‘मोठ्या भावा’ला लक्ष्य करणं सुरूच ठेवलंय. शेतकर्यांना कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती द्या, अशी मागणी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर शरसंधान केलं आणि विरोधकांच्या शिडात हवा भरली.
उद्धव यांची ही प्रतिक्रिया वेगानं विधानभवनात पोहोचली आणि जितेंद्र आव्हाडांना जोर आला. देवेंद्र सरकारच्या निषेधार्थ विरोधकांनी सभागृहाबाहेर प्रतिसभागृह चालवलं होतं. तिथे जाऊन त्यांनी, उद्धव हमारे साथ है, ये अंदर की बात है, असे नारे द्यायला सुरुवात केली. त्याच्या आवाजात त्यांच्या सहकार्यांनीही आवाज मिसळला आणि विधानभवन दणाणून सोडलं.
या संदर्भात शिवसेनेची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ते भाजपविरोधातच आवाज उठवण्याच्या तयारीत असल्याचं कळलं. भाजप मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे असतील, तर ते विरोधकांच्या सुरात सूर मिसळू शकतात. त्यासाठीच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या आमदारांची बैठकही झाली आहे. भाजपविरोधात बोलण्याची परवानगी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागितल्याचं समजतं. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात वादळी वार्याची, गडगडाटाची शक्यता आहेत.