रायगड : वैभववाडी तालुक्याच्या वैभवात अधिक भर टाकणार्या पर्यटन स्थळामध्ये करूळ घाट मार्गाचे आग्रहाने नाव घेतले जाते. सह्याद्रीच्या पायथ्याशी नागमोडी वळणाचा घाट ५० वर्षापूर्वीच्या स्थानिक मजुरांच्या अंगमेहनतीने व अथक परिश्रमाने अस्तित्वात आला आहे. आजूबाजूने नैसर्गिक साधनसामग्रीने नटलेल्या या घाटमार्गातून हजारो वाहनांची वर्दळ सुरू आहे. कोकणातील एकूण घाटमार्गापैकी करूळ घाट पर्यटकांना व या मार्गे येणार्या प्रवाशांना अधिक मोहिनी घालणारा घाट असा उल्लेख केला जात आहे. सिंधुदुर्ग व गोवा या ठिकाणच्या बहुतांश बाजारपेठा कोल्हापूर मार्केटवर अवलंबून आहेत. तब्बल ५० वर्षे हा घाटमार्ग सिंधुदुर्ग व कोल्हापूर या दोन जिल्ह्यामध्ये देवाण-घेवाणची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात भर व पर्यटनात देखील करूळ घाटाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
५० वर्षात करूळ या घाटमार्गात अनेक चढ-उतार आले आहेत. घाटमार्गाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आतापर्यंतचा करोडोचा निधी सा. बां. विभागामार्फत खर्च झाला आहे. जिल्ह्याच्या पर्यटनवृद्धीत घाटाचे योगदान मोठे असले तरी या घाटात अपघात होऊन मत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. सन १९९८मध्ये करूळ घाटमार्ग शुभारंभाची तारीख निश्चित करण्यात आली. दरम्यान भुईबावडा भागातील नागरिकांनी केवळ करूळ घाटमार्ग फोडण्यास विरोध केला. करूळ व भुईबावडा घाट एकाच वेळी फोडण्यात यावे अशी या नागरिकांची मागणी होती. यासाठी त्यांनी शासनाविरोधात आंदोलने, मोर्चे उभारले.
अखेर शासनाला तळ कोकणातील या नागरिकांची मागणी मान्य करत या दोन्ही घाट मंजुरीला हिरवा कंदील दाखवावा लागला. सन १९५८ तत्कालीन बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते या दोन्ही घाटांचा शुभारंभ करण्यात आला. गगनबावडा येथील चौकात ठळक अक्षरात घाटाबाबतचा मजकूर आजही प्रवाशांच्या दृष्टिक्षेपात पडतो. अर्थातच राष्ट्रीय उत्पन्नाचे साधन बनणारा हा घाटमार्ग असल्याने याची जबाबदारी सार्वजनिक बांधकामाकडे होती.
करूळ घाटात शुभांरभाच्या काही दिवसांनंतर कामाला सुरुवात करण्यात आली. पीस वर्क आणि फुटापद्धत याप्रमाणे कामे निश्चित करण्यात आली. सुरुवातीला २०० मजूर घाट फोडण्याच्या कामाला मजुरीवर होते. ६० फूट खोलीचे मातीचे काम स्थानिक मजुरांना देण्यात आले होते. पण या कामाला दर खूपच कमी होते. तर फूल कटिंगचे काम करणे मजुरांना जोखमीचे होते. काम अवघड व कठीण असल्याने मोठया कसरतीने काम करणे भाग होते. पुरुष मंडळींनीही कमरेला दोर्या बांधून दरडी कटिंगचे काम केले आहे ही वस्तुस्थिती आहे. कारण तेव्हा आजच्यासारखी यंत्रसामग्री नव्हती.
तरळे, विजयदुर्ग, खारेपाटण ते कणकवली या ठिकाणाहून मजूर घाट फोडण्याच्या कामाला आले होते. तर करूळ व भुईबावडा परिसरातील ग्रामस्थांनी दोन्ही घाट फोडण्यासाठी घेतलेला पुढाकार याला तोड नाही. परगावातून आलेल्या मजुरांना निवार्यासाठी तटे बांधून देण्यात आले होते. मजुरांना कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बैलगाडयांची व्यवस्था करण्यात आली होती.
तर ज्या ठिकाणी गाडी पोहोचत नाही अशा ठिकाणी महिलांमार्फत पाणी देण्याचे काम केले जात होते. तसेच काम करताना मजुरांना दुखापत झाल्यास औषधाच्या प्रथोमपचार पेटया घाटात ठिकठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. तर अत्यावश्यक वेळी गगनबावडा येथील डॉक्टर उपलब्ध करण्याची सोय करण्यात आली होती. हे सगळे चालू असताना विरोधी पक्षाची भूमिका बजावणारा लाल बावटा पक्ष वेळोवेळी कामात अधिक गतिमानता यावी यासाठी वारंवार प्रशासनाला जाब विचारत होता.
मजुरांसाठी स्वस्त धान्य दराचे दुकान उघडण्यात यावे अशा मागण्या ते वारंवार निवेदनाद्वारे करत होते. घाटात तीन र्वष काम करणार्या मजुरांना शासकीय सेवेत घेण्यात यावे व त्यांना सीनिआरिटीप्रमाणे सा. बां. विभागात काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी कोल्हापूर बोर्ड ऑफ चेंबरचे मेंबर्स डी. के. कोलते यांनी बांधकाम मंत्र्यांना निवेदनाद्वारे केली होती.
हजारो वाहनातून प्रवास करणार्या प्रवाशांना घाटरस्त्यातील दरडी, उंच कडे, दरी याबाबत माहीत आहे. परंतु प्रवाशांच्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करावे लागले की हा संपूर्ण घाट कोणतेही मशीन न वापरता फक्त आणि फक्त मजुरांच्या मेहनतीने व कलाकुसरीच्या बळावर अस्तित्वात आला आहे. त्या सर्व मजुरांना मानाचा मुजरा.
अखेर दहा वर्षाच्या अथक परिश्रमानंतर सन १९६८ मध्ये या मार्गावरून पहिले वाहन पोहोचले. दरम्यानच्या काळापर्यंत विजयदुर्ग बंदरमार्गे आलेला माल करूळ घाटपायथ्याच्या भट्टीवाडी या ठिकाणहून न्यावा लागत होता. विविध शासकीय कामे करण्यासाठी कोल्हापूरला नागरिकांना जावे लागत होते. या सर्व जिल्हावासीयांना पायरी घाट मार्गे चालत प्रवास करावा लागत होता.
घाटरस्ता सुरू झाल्यानंतर काही तुरळक वाहने सुरुवातीला जात होती. पावसाळयात या घाटातून जीव मुठीत घेऊन जावे लागत होते. अखेर सा. बां. ने घेतलेली मेहनत, निसर्गाने दिलेली साथ व स्थानिक नागरिकांनी घेतलेला पुढाकार यातूनच घाट रस्त्याची प्रगती होत गेली. आणि हा घाट चाळीस ते पन्नास वर्षात सर्वासाठी हवाहवासा वाटणारा घाट बनला.
नैसर्गिक सौंदर्यावर पर्यटकांवर भुरळ घालणारा करूळ घाट मान्सूनच्या पहिल्या पावसात आजारी पडला आहे. पावसाच्या सुरुवातीला हा घाटमार्ग सलाईनवर असल्याने पावसाचे चार महिने या घाटमार्ग प्रवास करणे खडतर बाब ठरणार आहे.
घाटमार्गातीन संरक्षक कठडे, भिंती, क्रॅश बॅरिअर व डांबरीकरणाची होणारी निकृ ष्ट दर्जाची कामे हेच घाटमार्ग पडझडीचे प्रमुख कारण आहे. या घाटमार्गात आतापर्यंत झालेल्या अनेक अपघातात शेकडो प्रवासी मृत्युमूखी पडले आहेत. परंतु आलेली संकटे बाजूला सारत या घाटमार्गाबाबत कोणतीही भीती मनात न बाळगता
वाहनचालक व प्रवाशांनी घाटातून प्रवास अविरत चालू ठेवला आहे. करूळचे सुपुत्र माजी आमदार ए. पी. सावंत यांचे हा घाटमार्ग सुरू होण्यास मोठे योगदान आहे. सन १९६८ मध्ये या घाटातून वाहतुकीला प्रारंभ झाला. सन १९९३ मध्ये ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात तब्बल ३० जण मृत्युमुखी पडले. या अपघातानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि या घाटाचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. हे जरी खरे असले तरी घाटमार्गात येणार्या विघ्नांची मालिका सुरूच राहिली आहे. चार दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा करूळ घाटाला बसला. ठिकठिकाणी घाटात दरडी पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
सा. बां. विभागाच्या अख्त्यारित येणार्या या घाटमार्गाकडे प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष केल्याने भविष्यात या मार्गाची स्थिती अधिक दयनिय होणार आहे. पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता प्रशासनाने घाटमार्ग दुरुस्तीकडे केलेले दुर्लक्ष पर्यटनाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. घाटमार्गाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणे गरजेचे आहे. परंतु सुरुवातीला घाटमार्ग सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत जाणकारांमधून व्यक्त होत आहे.
कोकणात निसर्गाने भरभरून दिले आहे. विशेषत: सिंधुदुर्गात येणारे पर्यटक निसर्गाने बहरलेल्या या जिल्हयाच्या प्रेमात पडत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून जिल्ह्यात येणार्या पर्यटकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. घाटमाथ्यावरून येणार्या पर्यटकांना करूळ घाट, भुईबावडा घाट, फोंडा घाट व आंबोली घाट, या मार्गाने प्रवास करावा लागतो. प्रवासाच्या दृष्टीने सोयीस्कर मार्ग म्हणून कोल्हापूर- विजयदुर्ग या मार्गाकडे पाहिले जाते. याच मार्गावर वैभववाडी व गगनबावडा तालुक्याच्या हद्दीवर १३ कि.मी. अंतराचा हा करूळ घाट आहे.
घाटातील नागमोडी वळणे, उंचावर असलेला किल्ले गगनगड, खोल दरीत दिसणारी टूूमदार घरे, सकाळच्या वेळी दरीतून उसळी मारणारे धुके यामुळे या मार्गे प्रवास करणारे पर्यटक घाटमार्गात मनमुराद आनंद घेतात. पर्यटकोंवर मोहिनी घालणारा घाट असाही या घाटाचा उल्लेख केला जातो. सिंधुदुर्ग व गोव्याकडे जाणारी सर्रास मालवाहतूक याच मार्गे होत असते. परंतु अडचणीच्या दुष्ट चक्रात हा घाटमार्ग सापडत चालला आहे. गेली काही र्वष प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व बेजबाबदारपणामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.
गेली तीन वर्ष ढासळलेले संरक्षण कठडे जैसे-थे स्थितीत आहेत. अशा कठडयाच्या ठिकाणी पावसाचे पाणी जाऊन ते अधिक ढासळणार आहेत. मागील वर्षी दोन ठिकाणी संरक्षण कठडे बांधण्यात आले होते. मात्र अद्याप १५ ते २० ठिकाणी संरक्षण कठडे ढासळलेल्या स्थितीत जैसे-थे आहेत. अशा धोकादायक ठिकाणी अनेक लहान- मोठे अपघात घडण्याची मालिका सुरूच आहे. घाटरस्त्यात दरीकडील बाजूस ठिकठिकाणी क्रॅश बॅरिअरचे संरक्षण देण्यात आलेले आहे. मात्र ते देखील कमकुवत आहे.
गगनबावडयापासून १ कि. मी. अंतरावर यू आकाराच्या वळणावर लोखंडी पाईपचे संरक्षण देण्यात आले आहे. परंतु यासाठी करण्यात आलेले बांधकाम केवळ पैसे उकळण्यासाठी झाले आहे. सिंमेटचा तुटपुंजा वापर करून करण्यात आलेल्या या बांधकामावरती पाणीदेखील न मारल्याने बांधकाम ठिसूळ बनले आहे. घाटमार्गात धोकादायक वळणे दाखवणारे फलक तसेच दिशादर्शक फलक आडवे झाले आहेत.
संबंधित प्रशासनाला फलक सरळ करण्यासाठी देखील वेळ मिळत नसल्याचे दिसत आहे. तर काही फलक दरीत पडले आहेत. रात्रीच्या वेळी प्रवास करताना दिशादर्शक फलक असणे फार गरजेचे आहे. प्रशासनाने या मार्गाकडे यापुढे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास या घाटमार्गात मोठी आपत्ती ओढवू शकते. हा मार्ग नामशेष होऊ शकतो, अशी भीती काही व्यक्त केली जात आहे.
एक मात्र खरे की सह्याद्रीचे आरसपाणी सौंदर्य हा घाट अधिक खुलवतो आणि अगदी जवळून त्याचे दर्शन घडवते. या घाटमार्गाने जाताना थ्रील काय असते याचा अनुभव येतो. उभा-आडवा कापलेला कडा आणि त्यातून नागमोडी जाणारी वाट हिरव्या रानातून लाजतलपत जात असल्याचा भास होतो. या मार्गावर अलीकडे हजारो माकडांच्या टोळया निवासासाठी दाखल झाल्या आहेत. यामुळे वाहनचालकांना भीतीही वाटते.