नवी मुंबई : पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तिच्या प्रसंगी नागरिकांना तातडीने मदत मिळावी आणि संभाव्य वित्त व मनुष्यहानी टळावी यासाठी सिडकोचा आपत्ती नियंत्रण कक्ष १ जून २०१५ कार्यरत झाला आहे. या कक्षास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येत आहे.
१५ जुलै २०१५ पर्यंत या कक्षाकडे एकूण ५१ तक्रारी आल्या. बांधकामाचा मलबा सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात आल्याच्या तक्रारी सर्वाधिक म्हणजे १४ आहेत. रस्त्यातील खड्डे आणि खोदकाम आढळून आल्याच्या एकूण १० तक्रारी या कक्षास प्राप्त झाल्या. अन्य तक्रारींमध्ये झाड पडणे, विद्युतपुरवठा खंडीत होणे, गटारावरील झाकण नसणे आणि जलवाहिनीच्या गळतींच्या तक्रारींचा समावेश आहे.
सर्वाधिक १२ तक्रारी खारघरमधून प्राप्त झाल्या, तर पनवेल व द्रोणागिरीमधून प्रत्येकी ११ तक्रारी प्राप्त झाल्या. तळोजा, कळंबोली, उलवे, द्रोणागिरी आणि कामोठे या नोडमधूनही नागरिकांनी तक्रारी नोंदवल्या. साधारणता दीड दिवसात सामान्य तक्रारींचे निराकरण करण्यात आले.
या सुमारास नवी मुंबईत ७८० मि.मि. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक १०३१ मि.मि. पावसाची नोंद द्रोणागिरी येथे झाली असून सर्वात कमी म्हणजे ५१२.५० मि.मि. पावसाची नोंद झाली. उलवे येथे ९१६, वाशी येथे ८२०, बेलापूरमध्ये ७९१ तसेच खारघरमध्ये ७७५ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे.
हा कक्ष सिडको अधिकार क्षेत्रापुरता सीमित आहे. सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनच्या तळमजल्यावर उघडण्यात आलेला हा नियंत्रण कक्ष शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही २४ तास कार्यरत असतो.
या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, उद्यान विभाग आदी महत्वाच्या विभागाचे कर्मचारी २४ तास संपर्कात असतील. नागरिकांना आपल्या तक्रारी ६१०५४५४० या दूरध्वनी क्रमांकावर कळविता येतील. तसेच दुर्घटनास्थळाचे छायाचित्र ८८७९२२८८९६ या क्रमांकाच्या वॉट्सपवर पाठविता येईल.
वैद्यकीय मदत तातडीने मिळावी यासाठी म्ब्युलन्स सेवाही उपलब्ध करण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या वेळी पाणी साठल्यास पाण्याचा उपसा करणारी यंत्रसामुग्री २४ तास उपलब्ध करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपत्कालीन स्थितीची माहिती सिडको आपत्ती नियंत्रण कक्षास ताबडतोब द्यावी, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.