* ऐरोली येथे जागतिक कांदळवन दिनानिमित्त वृक्षारोपण
नवी मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनामध्ये कांदळवनाचा मोलाचा वाटा आहे. पूर्वी कांदळवनाला इतके महत्व दिले जायचे नाही. परंतु, 26 जुलै 2005 साली झालेल्या जल प्रलयामुळे कांदळवनाचे महत्व सर्वांना पटू लागले. कांदळवन ही वनस्पती समुद्रात निर्माण होणार्या लाटांना अटकाव करु शकते, हे समोर आल्यानंतर न्यायालयाने कांदळवनाचे सरक्षण करण्याचे आदेश दिले असून या कांदळवनाच्या संरक्षणाची सुरुवात ऐरोलीमधून होत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन आ. संदीप नाईक यांनी केले.
जागतिक कांदळवन दिनानिमित्त रविवारी (ता.26) ऐरोली येथील दिवा गाव जेटीवर ग्रीन होप आणि कांदळवन संधारण घटक मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खारफुटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी आ. नाईक बोलत होते. यावेळी महापौर सुधाकर सोनावणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, राष्ट्रवादीचे नवी मुंबई युवक अध्यक्ष जयेश कोंडे, कांदळवनचे मुख्य वनअधिकारी एन. वासुदेवन, वनअधिकारी श्री. माळी, माजी नगरसेवक तात्या तेली, अशोक पाटील, समाजसेवक दिनेश पारख, एफ. जी. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक, समाजसेवक यू पी भोसले, जितेंद्र पारख, अनिल नाख्ते, हिरामण राठोड, राजेंद्र जोशी, चिंतामन केणी, चंदन मढवी, दीपक पाटील, यांच्यासह अनेक मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबई ही एक पर्यावरणपुरक नगरी असून आता या शहराला प्लॅस्टीक मुक्त करण्याची घोषणा आ. नाईक यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी केली. ते म्हणाले की, नाल्यांद्वारे प्लॅस्टीकच्या पिशव्या समुद्रामध्ये टाकल्या जातात. हे प्लॅस्टीक ओघाने खाडीकिनारी येते. त्यामुळे खाडीचे मुख्य संरक्षक असेले जलचर प्राणी खेकडे आणि मासे सारख्या प्राण्यांचे जीव धोक्यात येतात. याचा परिणाम कोळी बांधवांचा मुख्य व्यवसाय असणार्या मासेमारीच्या उत्पन्नावर देखील होतो. त्यामुळे खाडी प्रदुषण थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. नाईक यांनी सांगितले.
महापौर सुधाकर सोनावणे यांनी कांदळवन अधिकार्यांचे कौतुक करत आमदार नाईक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या ग्रीन होप या संस्थेच्या माध्यमातून आज नवी मुंबईत जवळपास लाखो झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे जोपासण्याचेही काम चांगल्या प्रकारे होत आहे. आज वन विभाग देखील कांदळवनाच्या संरक्षणासाठी अग्रेसर आहे, ही बाब कौतुकस्पद आहे.
मुख्य कांदळवन संरक्षक अधिकारी एन. वासुदेवन म्हणाले की, सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वच देशांना धोका आहे. मात्र नवी मुंबईतील सर्वांच्या योगदानामुळे कांदळवनाचे संरक्षण होत आहे. स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा या उद्देशाने आज खेकडा आणि मासे पालन व्यवसाय सुरु आहे.
कार्यक्रमाप्रसंगी आ. नाईक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कांदळवन सुरक्षा रक्षकांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले तसेच अलिबाग येथे डॉल्फीन माशाला वाचविण्याकरीता प्रयत्न केलेल्या वन अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांचाही सत्कार करण्यात आला.
एफ. जी. नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी, राजर्षि छत्रपती शाहू महाराज विद्यालयाचे विद्यार्थी व नागरिकांच्या उपस्थितीत ऐरोली प्रभाग क्रमांक 23 मध्ये जागतिक कांदळवन दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती रॅली काढली होती. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगावा, कांदळवनाचे सरक्षण करा अशा घोषणाही दिल्या.
******
नवी मुंबईतील खारफुटी टुरिझमसाठी आमदार निधीतून 30 लाखांचा निधी दिला असून कांदळवनाच्या संरक्षासाठी शासनाकडून 1 कोटीचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु.
-आ. संदीप नाईक