मुंबई : गुंतवणूकदारांचे खरेदीचे सातत्य सलग तिसर्या सत्रात कायम राहिले. येत्या चार वर्षात बँकांना लागणार्या अतिरिक्त भांडवलाच्या पूर्ततेची ठोस योजना सरकारने सादर करत बँकांच्या शेअरमध्ये नवी उमेद जागवली. या जोरावर झालेल्या बँकांच्या शेअर खरेदीने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४०९.२१ अंकांनी उसळून २८,११४.५६वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १११.०५ अंकांनी उंचावून हा निर्देशांक ८,५३२.८५वर बंद झाला.
गेल्या महिनाभरातील एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी घट ठरली. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेच्या बुडीत कर्जाच्या स्थितीत सुधारणा होऊन त्याचाही बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. याबरोबरच पुढच्या आठवडयापासून ईपीएफओ बाजारात गुंतवणूक सुरू करण्याच्या शक्यतेचाही बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.आठवडाभराची कामगिरी पाहता सेन्सेक्स आणि निफ्टीची कामगिरी यथातथाच झाली.
तेजीची कमान सर्वार्थाने बँकांच्या हाती राहिली. सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआयने सर्वाधिक ५.२५ टक्के वाढ नोंदवली. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक (३.९७ टक्के) या बँकेची कामगिरी झाली. कोल इंडिया, लुपिन, डॉ. रेड्डीज, हिरो मोटोकॉर्प यांच्यासह २५ शेअर वधारले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बांधकाम आणि आरोग्यसेवा यांनी २.८९ टक्क्यापर्यत वाढ नोंदवली. तर ऊर्जा आणि तेल आणि वायू क्षेत्राचे निर्देशांक ०.६० टक्क्यापर्यत वाढले. दरम्यान, गुरुवारी परदेशी गुंतवणूकदारांनी १७०.६८ कोटी रुपयांची विक्री केली.
येत्या पतधोरणात व्याजदर कपातीची शक्यता आणि तिमाही निकालातून बँकांच्या थकीत कर्जाची सुधारलेली स्थिती यामुळे बाजारात तेजीचे वारे वाहत असल्याचे जिओजित बीएनपी परिबा फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी म्हटले आहे.
बँका आणि आयातदारांनी केलेल्या डॉलरच्या खरेदीने रुपया पुन्हा डळमळीत झाला असून शुक्रवारी डॉलरसमोर ९ पैशांचे अवमूलन दर्शवत तो ६४.१३वर बंद झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरमध्ये कमजोरी असतानाही रुपयाला त्याचा फायदा होऊ शकला नाही.