** ऐतिहासिक वारसा जपणारे श्रीमंत ठाणे
एखाद्या नगराचे वैभव हे त्यातील उद्याने, जलाशये किंवा इमारतींवर अवलंबून नसून तेथील समृद्ध ग्रंथालयांवर अवलंबून असते हे एका ग्रीक तत्त्ववेत्त्याचे उद्गार ठाणे शहराला तंतोतंत लागू पडतात. महाराष्ट्राला सार्वजनिक ग्रंथालयांची महान परंपरा लाभली असली तरी ठाणे शहर त्या परंपरेत पहिल्या क्रमांकावर आहे.
ठाणे शहराची ओळख ऐतिहासिक शहर अशी आहे. इ.स. 636 पासून या गावाचा इतिहासाशी संबंध येतो. त्याचबरोबर त्याला एक साहित्यिक व सांस्कृतिक गंधही आहे. ठाण्याचा आधुनिक चेहरा संपन्न दिसत असला तरी त्याची खरी श्रीमंती त्याच्या ऐतिहासिक वारशात आणि सांस्कृतिक वैभवात आहे.
इ.स. 997च्या एका ताम्रपटात ठाण्याचा उल्लेख श्री स्थानक असा केलेला आहे. इतिहासावरून असे स्पष्ट दिसते की, ठाणे गाव केवळ एक मुख्य भरभराटीस आलेले गाव नव्हते तर ती उत्तर कोकणातील शिलाहार घराण्याची राजधानी होती. इ.स. 1538च्या सुमारास ठाणे शहराचा विस्तार 4 मैल सभोवार पसरलेला होता.
शहरात 60 देवळे-मशिदी व 60 तलाव होते. यापैकी बरीच देवळे आज जमीनदोस्त झाली आहेत. केवळ निसर्गाच्या अवकृपेमुळे वा वयोमानानुसार ती देवळे जमीनदोस्त झालेली नाहीत तर धर्माध पोर्तुगीजांच्या अत्याचारी कृत्यांची ती बळी ठरली. शहरातील घरे कौलारू होती.
आंबे, पोफळी, आवळा, चिंच यांच्या बागा होत्या. या काळात ठाण्याला हातमागाचा धंदा उत्कर्षाला पोहोचला होता. ठाण्याचे कापड पाश्चामात्त्य देशात लौकिक पावले होते. ठाण्यातील पोर्तुगीजांची सत्ता 1737 मध्ये गेली. पुढे मराठयांनी वसईचा किल्ला सर केला. ठाण्याला सध्या जी जिल्हा न्यायालयाची इमारत आहे, ती पेशव्यांच्या सुभेदाराच्या वाडयाचा अवशेष आहे.
28 डिसेंबर 1774 पासून ठाण्याला ब्रिटिश राजवट सुरू झाली. 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर आशिया खंडातील पहिली रेल्वे धावली. त्यामुळे ठाण्याचे नाव जगाच्या नकाशावर चमकले. त्यानंतर ठाणे शहराची लोकसंख्या हळूहळू वाढू लागली. 1881 मध्ये शहराची लोकसंख्या फक्त 18,456 होती हे ऐकून आज अनेकांना आश्चर्य वाटेल.
ठाणे रेल्वे स्टेशनपासून गावात जाण्यासाठी एकच रस्ता होता. याच भागात सध्या पीडब्ल्यूडी कचेरी, मुलींची शाळा, जुन्या नगरपालिकेची इमारत आहे. चेंदणी, महागिरी, खारकर आळी, कलेक्टर कचेरी, उथळसर हा भाग आजही आहे. रस्त्याच्या दुतर्फा दुकाने होती. ती प्रामुख्याने किराणा माल, कापडचोपड, भांडीकुंडी यांची होती. रस्त्याच्या पश्चिमेला मासुंदा तलाव, मध्यभागी कौपीनेश्वर मंदिर, त्याच्या समोरच्या भागात मंडई, पश्चिमेलाच सिद्धिविनायक गणपती मंदिर, त्याच्यासमोर पेढया मारुती मंदिर या वास्तू आजही आहेत.
चरई भाग, कलेक्टर कचेरीजवळून जाणारा जुना पुणे-मुंबई रस्ता, पारसिक टेकडी, साष्टीची खाडी व येऊरचा डोंगरही पूर्वीपासून अस्तित्वात आहे. राबोडी, उथळसर इत्यादी भाग आजही त्याच नावाने ओळखले जातात. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या ठाण्याला प्राचीनतेचा एक गंध आहे. त्याच्या पुसट झालेल्या खाणाखुणा अनेक ठिकाणी आज अस्तित्वात आहेत.
ठाण्याचे कारागृह 237 वर्षापूर्वीचे प्राचीन आहे. त्यापूर्वी तो किल्ला होता. 1778 मध्ये इंग्रजांनी त्याचे रूपांतर कारागृहात केले. भारतीय देशभक्तांच्या निवासाने व देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर गेलेल्या क्रांतिकारकांच्या आठवणींनी पुनीत झालेले कारागृह अशी त्याची ख्याती आहे. कारागृहाच्या तटांना वा भितींना कान लावून ऐकलेत तर स्वातंत्र्यासाठी झालेल्या आत्मयज्ञाचे पोवाडे त्यातून आजही ऐकू येतील. 100 वर्षाहून अधिक काळ अस्तित्वात असलेल्या अनेक वास्तू, संस्था, देवळे, मशिदी, चर्चेस व प्रार्थनास्थळे नागरिकांना प्राचीनतेची साक्ष देतील.
पूर्वीच्या जुन्या ठाणे शहराचा चेहरा समोर आणलात तर बारीक-सारीक गल्ल्या, अरुंद बोळ, खडी-मुरमाचे रस्ते, लाल-काळी माती, मिणमिणते दिवे, छोटया-मोठ्या चाळी, कौलारू घरे, लहान-मोठे वाडे, लहान व प्रशस्त विहिरी, तलाव व खाडया, मोठी भातखाचरे, कुडाची घरे, लहान-मोठी मिठागरे, मोजक्या शाळा, दाट जंगल, हिरवीगर्द झाडी, त्यावरील कोकिळांचे मधुर गुंजन, चिमण्यांचा चिवचिवाट, टांग्यांचा टपटपाट, किल्ले व डोंगर, मोकळी मैदाने, त्यावर चालणारे आट्यापाट्या-हुतुतू-खो-खोंचे खेळ, आपुलकीचे साजरे होणारे सण-उत्सव आणि मुख्य म्हणजे एकमेकांच्या एकेरी नावानं हाक मारणारी आपुलकीची माणसं असं सुरेख चित्र होते.
बृहन्मुंबईच्या उंबरठ्यावरील ठाणे त्या काळी जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी मुंबईवर अवलंबून असे. ठाणेकर धान्य खरेदीसाठी मस्जिद बंदरला जात असे. भाजीपाल्याच्या खरेदीसाठी तो भायखळ्याला धाव घेई. लग्नसराईतली कापडचोपड आणि विविध वस्त्रांची खरेदी दादरहून होई, तर दागदागिन्यांची खरेदी गिरगाव/दादरहून होत असे. फर्निचरसाठी तो उल्हासनगरला पसंती देत असे.
एखाद्या नगराचे वैभव हे त्यातील उद्याने, जलाशये किंवा इमारतींवर अवलंबून नसून तेथील समृद्ध ग्रंथालयांवर अवलंबून असते हे एका ग्रीक तत्त्ववेत्त्याचे उद्गार ठाणे शहराला तंतोतंत लागू पडतात. महाराष्ट्राला सार्वजनिक ग्रंथालयांची महान परंपरा लाभली असली तरी ठाणे शहर त्या परंपरेत पहिल्या क्रमांकावर आहे. 1 जून 1893 साली स्थापन झालेले मराठी ग्रंथसंग्रहालय हे ठाणे शहराचे भूषण असून महाराष्ट्रातील ग्रंथालयांच्या पितृस्थानी असलेले ग्रंथालय असा त्याचा सार्थ गौरव पद्मश्री वि. स. खांडेकर यांनी केला होता.
दुर्मीळ व प्राचीन ग्रंथ, तसेच संदर्भ विभाग हे या ग्रंथसंग्रहालयाचे खास वैशिष्टय आहे. दत्तो वामन पोतदार यांनी ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा ज्ञानाची सदावत्रे असा केलेला उल्लेख संस्थेबद्दल खूप काही सांगून जाणारा आहे. ठाण्याच्या टेंभी नाक्यावरील नगर वाचन मंदिर म्हणजे पूर्वीची म्युलक लायब्ररी ही इंग्रजांच्या काळात 1850 मध्ये स्थापन झाली. खासकरून इंग्रजी पुस्तके व ग्रंथ त्या काळी जास्त असत.
1933पासून या लायब्ररीत वाचकांना मराठी पुस्तकेही मिळू लागली. ठाण्याची प्राच्यविद्या अभ्यास संस्था ही शहराच्या वैभवात भर टाकणारी संस्था असून तिने अभ्यासकांसाठी ज्ञानाचे एक दालनच उपलब्ध करून दिले आहे. सुमारे 25 हजारावर पुस्तके, 4 हजारावर नियतकालिके, दुर्मीळ हस्तलिखिते, छापील पोथ्या, प्राचीन नाणी, शिल्पे, मूर्ती असा पुराण वस्तुसंग्रहाचा खजिनाच तेथे उपलब्ध आहे.
श्री कौपीनेश्वर मंदिराचा ठाण्याचा पुराण पुरुष असा उल्लेख केला जातो. पण ते केवळ मंदिर नाही तर ते ज्ञानकेंद्रही आहे. 1977 पासून तेथे वाचकांसाठी ज्ञानकेंद्र वाचनालय सुरू झाले. धार्मिक ग्रंथ, तत्त्वज्ञानविषयक पुस्तके, संतवाङ्मय, संस्कृत-मराठी शब्दकोश, जैन धर्मकोश व तत्त्वज्ञान कोश ही या ज्ञानकेंद्राची आध्यात्मिक श्रीमंती आहे. व्याख्याने व चर्चासत्रेही तेथे अधूनमधून होत असतात.
राम गणेश गडकरी रंगायतन, नवीन झालेले ठाणे कलाभवन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृहाच्या रूपाने ठाणे शहराच्या सांस्कृतिक वैभवाला बहर आला असून नाटके, एकांकिका स्पर्धा, नृत्याविष्कार, प्रदर्शने, व्याख्याने, चर्चासत्रे, पुस्तक प्रकाशने आणि संगीताचे कार्यक्रम यांची त्या ठिकाणी नेहमी रेलचेल असते. राम गणेश गडकरी रंगायतन हे केवळ नाटयगृह नाही तर तो कट्टा म्हणून प्रसिद्ध होता. या कट्टयावर विचारांचे आदान-प्रदान व मनमोकळ्या गप्पासप्पा होऊन तेथे अनेक कलावंत घडले व ते पुढे नावारूपाला आले.
गेल्या काही वर्षात ठाण्यात स्थापन झालेल्या अत्रे कट्टा, अभिनय कट्टा व ब्रह्मांड कट्टयाने समाजमनात एक सांस्कृतिक स्थान निर्माण केले आहे. अलीकडे म्हणजे गेल्या दहा वर्षात व्यास क्रिएशन्स या संस्थेनेही ज्येष्ठ महोत्सव, करिअर मंत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देऊन ठाणेकरांच्या मनात एक आपुलकीचा बंध निर्माण केला आहे.
बदलत्या ठाण्याचा विचार करताना एक गोष्ट ठळकपणे जाणवते की 1853 हे वर्ष ठाणे गावाला व लोकांच्या जीवनाला कलाटणी देणारे वर्ष ठरले. 16 एप्रिल 1853 रोजी वाफेच्या इंजिनची पहिली रेल्वेगाडी मुंबई-ठाणे मार्गावर धावली. या रेल्वे प्रवासाला ठाणे-मुंबईतील लोकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. रेल्वेगाडीचं स्वागत भारतीय लोक कसे करतील याबद्दल ब्रिटिशांना संदेह होता. पण त्यांचा समज लोकांनी खोटा ठरवला.
भारतीय समाज त्या काळी जातीपातीत विभागला गेला होता. त्या समाजाला एकरस, एकात्म करण्याचे प्रयत्न थोर समाजसुधारक व संत-महात्म्यांनी केले याबद्दल शंकाच नाही. पण त्याला खर्या अर्थाने वेग आला तो रेल्वेच्या आगमनामुळे. रेल्वेने त्याला आकार आणि रूप दिले.
रेल्वेमुळे माणसे अधिक जवळ आली. परस्परांच्या खांद्याला खांदा देऊन उदरनिर्वाह करती झाली आणि पुढे पुढे तर रोटीबरोबरच बेटी व्यवहारालाही ती उद्युक्त झाली. ठाण्याच्या लोकांना रेल्वेमुळे समाजपरिवर्तनाची पहिली संधी मिळाली आणि ठाणेकर त्यात शंभर टक्के उत्तीर्ण झाले असे म्हणावे लागेल. बदलत्या ठाण्याचे पहिले श्रेय प्रामुख्याने ठाणेकरांच्या या समाजपरिवर्तनाला द्यावे लागेल.
ठाणेकरांच्या जीवनशैलीला कलाटणी देणारी दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे ठाणे नगरपालिकेची स्थापना. 1863 मध्ये ठाणे नगरपालिका अस्तित्वात आली. ठाणे त्यावेळी खूप छोटे होते. नौपाडा हा भाग आज अत्यंत गजबजलेला दिसतो. पण तो भाग त्यावेळी ठाणे नगरपालिकेत समाविष्ट नव्हता. तेथे ग्रामपंचायत होती, हे ऐकून आज अनेकांना आश्चर्य वाटेल.
नगरपालिकेच्या माध्यमातून राज्यकारभाराचे प्रशिक्षण शेकडो लोकप्रतिनिधींना मिळालेच. शिवाय रस्ते, पाणी, आरोग्य, दिवाबत्ती, शिक्षण, कायदा, न्याय, वाहतूक, दळणवळण, व्यापार, उद्योग अशा अनेक क्षेत्रांच्या विकासाला चालना मिळाल्यामुळे ठाण्याचे स्वरूप हळूहळू बदलत गेले.
1960 साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमुळे ठाण्याचा चेहरा अधिक विस्तृत व उद्योगशील होण्यास सुरुवात झाली. त्याच साली आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून वागळे इस्टेटची स्थापना करण्यात आली. सर्व प्रकारचे उद्योग या वसाहतीमध्ये एकवटले. मोठया प्रमाणावर लघुउद्योगांची स्थापना होऊन औद्योगिक भरभराटीला चालना मिळाली. कामगारांना रोजगार मिळाला.
लोकसंख्या हळूहळू वाढू लागली. ठाण्याची ख्याती उद्योग-पंढरी अशी होऊन गावाचे उद्योग क्षितिज त्यामुळे मोठे झाले. मोटारी, रिक्षा आदी अनेक वाहनांची संख्या वाढून ठाणे गावाचे रूपांतर शहरात झाले. गेल्या पाच-सहा दशकांच्या लोकसंख्येवर नजर टाकली तर ठाण्याची लोकसंख्या दर दहा वर्षानी प्रचंड प्रमाणावर वाढल्याचे लक्षात येईल. लोकसंख्या वाढण्याच्या या प्रक्रियेमुळेच 1982 मध्ये ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाली.
ठाणे महापालिकेच्या गेल्या 33 वर्षाच्या कारकिर्दीत ठाणे शहराच्या रंगरूपात हळूहळू नावीन्याची भर पडू लागली. लोकवस्ती वाढू लागली. जुने वाडे आणि चाळी यांनी कात टाकली. ठिकठिकाणी हाऊसिंग सोसायटया उभ्या राहिल्या. आकर्षक रचना असलेल्या इमारतींची नवी संकुले उभी राहिली. टांग्यांना मागे टाकून रस्त्यावर रिक्षा धावू लागल्या. नव्या ब्लॉकमध्ये कोरे पडदे नव्या संसाराचं दर्शन घडवू लागले.
मातीच्या व धुळीच्या रस्त्यांचे रूपांतर डांबरीकरण, काँक्रिटने झाले. मिणमिणत्या कंदील-दिव्यांची जागा विजेच्या प्रखर दिव्यांनी घेतली. गगनचुंबी टॉवर्स, आलिशान मॉल्स, भव्य व विशाल संकुले, उंची हॉटेल्स, देखणी उद्याने, सुशोभित तलाव, आकर्षक दुकाने, भव्य कलादालन, प्रशस्त रस्ते, सुशोभित चौक, स्कायवॉक, उड्डाणपूल अशा कितीतरी गोष्टींची ठाणे शहराच्या लौकिकात भर पडत आहे. ठाणे आणि मुंबई यामध्ये आता विशेष फरक राहिलेला नाही. आता इथल्या दुकानांच्या शोकेसमध्ये लावलेल्या तलम, रंगीत आणि आकर्षक कपडयांचे सौंदर्य नजरेत ठरत नाही अशी आज अवस्था आहे. सोन्या-चांदीच्या पेढयांमधील सोनेरी लखलखाट आणि चंदेरी चमचमाट गृहिणींच्या डोळ्यांना आणि मनाला आज खुणावीत आहे तर हिरव्यागार भाज्या आणि ताजी फळ फळावळ यांची रेलचेल लोकांना खरेदीसाठी सुखावीत आहे.
पूर्वीचे ठाणे आणि आत्ताचे ठाणे! जमीन-अस्मानाचा फरक नजरेला दिसून येईल. त्या बदलाचे अर्थ सांगावे तितके थोडेच. ठाण्याची लोकसंख्या आज 20 लाखांच्या घरात पोहोचली आहे. ऐतिहासिक शहर, सांस्कृतिक वैभव आणि ठाण्याचं ठाणेपण आणि अनेक वैशिष्टये जपत विकासाच्या बाबतीत ठाणे महानगर आज गरुडझेप घेण्यासाठी सिद्ध झाले आहे. भव्यता, नवीनता आणि भरारी यामध्ये त्याला आता आकाशाला गवसणी घालायची आहे.
162 वर्षापूर्वी देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीच्या वाफेच्या इंजिनचं ठाण्याने खूप कौतुक केलं होतं. विकासाच्या बाबतीत ग्रोथ इंजिन ठरत असलेले ठाणे महानगर आता मेट्रो आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानांची उड्डाणे यांची स्वप्ने साकार करण्यासाठी उत्सुक झाले आहे.
ठाण्याला आता हवाई वाहतुकीचे वेध लागले आहेत. विकासाची पहाट अवतरलेल्या ठाणे महानगराला आता आधुनिकतेचा वसा जपण्याची ओढ लागली आहे. कायापालट झालेल्या देखण्या ठाण्याचा मेकओव्हर आता दृष्टिपथात आहे. गुणवत्ता, माणुसकी, आपलेपणा जपणारे ठाणे आता उंच माझा झोका या गीताच्या धर्तीवर अधिकाधिक उंच होण्याच्या प्रयत्नात आहे. एकाच वाक्यात सांगायचे झाले तर महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या या महानगराने ठाणे माझे जीवनगाणे हे गीत गुणगणायला सुरुवात केली आहे.
साभार – दै. प्रहार