कुंटणखान्यातून 21 मुलींची सुटका
नवी मुंबई: अल्पवयीन मुलींना गुंगीचे औषध देऊन त्यांना पळवून नेत आग्रा येथील कुंटणखान्यात वेश्या व्यवसायासाठी विकणार्या टोळीच्या मुसक्या नवी मुंबई पोलिसांना आवळल्या आहेत. आग्र्याहून आपली सुटका करून नवी मुंबईत दाखल झालेल्या पीडित मुलीच्या मदतीने पोलिसांनी आग्रामधील कश्मिरी बजार भागातील कुंटणखान्यावर धाड टाकत 21 मुलींची सुटका केली.
नवी मुंबई मध्ये राहणार्या पीडित मुलीचे 2007 साली अपहरण करण्यात आले होते. त्यावेळेस ही मुलगी 12 वर्षांची होती. उद्यानात खेळताना एका महिलेने गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध करुन थेट आग्रा येथील कुंटणखान्यात नेलं होतं. येथून पळून जाण्याचा तिने अनेकदा प्रयत्नही केला. मात्र, त्यात तिला यश येत नव्हतं.
अखेर एका गिर्हाईकाच्या मदतीने तिने येथून आपली सुटका करून घेत थेट नवी मुंबई गाठली. नवी मुंबईत येताच तिने नेरुळ पोलीस स्टेशन गाठून सर्व प्रकरणाचा खुलासा केला. नवी मुंबई पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आग्रा पोलिसांच्या साथीने थेट कश्मिरी बजार भागातील कुंटणखान्यावर छापा टाकत 21 मुंलीची सुटका केली. यातील 5 मुली या महाराष्ट्रातील असून इतर मुली परराज्यातील आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कुंटणखाना चालविणार्या परविन खान दलाल श्रीमान तामन, सुभाष चंद, जेन लोन या चार आरोपींना अटक केली आहे.
(सौजन्य : एबीपी माझा)