नवी दिल्ली : आपल्या संपूर्ण आयुष्यात वादांपासून दूर राहिलेले भारताचे ‘मिसाइल मॅन’, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर त्यांच्या जुन्या-नव्या सहकार्यांमध्ये वारसाहक्काचा वाद सुरू झाला आहे. डॉ. कलाम यांचं अधिकृत फेसबुक आणि ट्विटर अकाउंट कोण सांभाळणार, यावरून संघर्षाची ठिणगी पडली आहे.
शांत, संयमी, प्रसन्न, हसतमुख व्यक्तिमत्व ही डॉ. कलामांची ओळख होती. विद्यादानाच्या पवित्र कामात ते आयुष्यभर रमले. अणुशास्त्रज्ञ म्हणून वेगवेगळ्या संस्थांमध्ये मानाच्या पदांवर त्यांनी काम केलं होतं. देशातील सर्वोच्च स्थानी, राष्ट्रपतीपदावरही ते विराजमान झाले होते. परंतु, या संपूर्ण वाटचालीत त्यांचा कधी कुणाशी वाद झाल्याचं ऐकिवात नाही. त्यांनी कधी कुणाला नकळतही दुखावलं नाही. मात्र आता, कलामांच्या निधनाला जेमतेम आठवडा झाला असताना, कलामांसोबत बराच काळ काम केलेले सहकारी आणि नव्या शिष्यामध्ये ‘सरां’च्या सोशल मीडिया अकाउंट्सच्या हक्कांवरून जुंपली आहे.
गेल्या काही वर्षांपासून डॉ. कलाम यांचा अत्यंत निकटचा सहकारी असलेला, त्यांच्यासोबत काही पुस्तकांचं लिखाण केलेला सृजन पाल सिंह हा तरुण कलामसराचं फेसबुक आणि ट्विटर अकाउंट सांभाळत होता. त्यांच्या शेवटच्या क्षणांचा साक्षीदार होण्याचं भाग्यही त्याला लाभलं होतं. कलामांच्या निधनानंतर त्यानं लिहिलेला, ‘कलामांसोबतचे शेवटचे आठ तास’ हा लेख सोशल मीडियावर प्रचंड गाजला होता. तेव्हाच, आपल्या प्रिय सरांचं फेसबुक आणि ट्विटर अकाउंट सुरूच ठेवण्याची घोषणा त्यानं केली होती. परंतु, कलाम यांच्या अधिकृत अकाउंटवरून सृजन पालनं मतं मांडणं, प्रतिक्रिया देणं राष्ट्रपती कार्यालयाला अजिबात मान्य नाही. त्यावरूनच कार्यालयाचे अधिकारी आणि सृजन पाल सिंह यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाची किंवा त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू केलेली सोशल मीडियावरची सर्व खाती बंद करण्याच्या सूचना माजी राष्ट्रपतींच्या कार्यालयानं दिल्या आहेत. सृजन पाल सिंहने कलामांसोबतचे अनुभव जरूर शेअर करावेत, पण ते स्वतःच्या अकाउंटवरून करावेत. फेसबुक, ट्विटरवरची कलामांची अधिकृत अकाउंट सांभाळण्यास कार्यालय समर्थ आहे, असं स्पष्ट मत कलामांसोबत दोन दशकं वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केलेले शास्त्रज्ञ वी. पोनराज यांनी व्यक्त केलंय. मात्र, सृजन पाल सिंह हक्क सोडायला तयार नाही. कलाम यांनी सोशल मीडियावरची आपली खाती सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती, असं त्यानं ठामपणे सांगितलंय. सरांच्या ’हँडल’वरून मी माझे व्यक्तिगत अनुभव लिहितोय, त्यांची मतं मांडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही त्यानं नमूद केलंय. त्यामुळे आता हा वारसाहक्काचा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अर्थात, कलामसरांच्या कुठल्याही चाहत्याला हा संघर्ष रुचणारा, पटणारा नाही, हे नक्की!