नॉटिंगहॅम : वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या (१५ धावांत ८ विकेट) अचूक आणि प्रभावी मार्यासमोर ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८.३ षटकांत केवळ ६० धावांत आटोपला.
पहिल्या दिवसअखेर शुक्रवारी तिसर्या सत्रात ३ बाद १२० धावा करताना ६० धावांची आघाडी घेतली. यजमान कर्णधार ऍलिस्टर कुकने नाणेफेक जिंकून पाहुण्यांना प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. त्यानंतर ट्रेंटब्रिजच्या ‘स्विंग’ला अनुकूल खेळपट्टीवर अनुभवी ब्रॉडने ऑस्ट्रेलियाला अक्षरश: नाचवले.
पाहुण्यांतर्फे तळातील मिचेल जॉन्सन (१३) आणि कर्णधार मायकेल क्लार्कलाच (१०) दोन आकडी धावा करता आल्या. सलामीवीर ख्रिस रॉजर्स आणि डेव्हिड वॉर्नर तसेच शॉन मार्श खातेही उघडू शकले नाहीत. ब्रॉडने नियंत्रित मारा करताना अनुभवी जेम्स अँडरसनची अनुपस्थिती जाणवू दिली नाही.
त्याने पहिल्याच षटकात रॉजर्स आणि स्मिथला (६) माघारी धाडले. पुढच्याच षटकात मार्क वुडने वॉर्नरला बाद केले. ब्रॉडने वैयक्तिक दुसर्या षटकात मार्शची विकेट घेतली. त्यानंतर ऍडम वोग्जलाही (१) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद २१ धावा अशी केली.
ब्रॉडने अचूक मारा करताना एकामागोमाग एक विकेट घेत प्रतिस्पर्ध्यांना सळो की पळो करून सोडले. बरोबर १०० मिनिटांत आणि १८.३ षटकांत ऑस्ट्रेलियाचा डाव ६० धावांत संपला. त्यांच्या डावातील सर्वाधिक धावा अंवातर (१४) स्वरूपातील आहेत. कमीत कमी चेंडूंमध्ये (१११) आटोपलेला हा कसोटी इतिहासातील सर्वात छोटा डाव आहे.
कर्णधार ऍलिस्टर कुक (४३) आणि ज्यो रूटच्या (खेळत आहे ५२) दमदार फलंदाजीमुळे इंग्लंडने तिसर्या सत्रात ३ बाद १३१ धावा करताना ७१ धावांची आघाडी घेतली. यजमानांच्या पहिल्या तिन्ही विकेट मिचेल स्टार्कने घेतल्या.
.
**‘कॅचेस विन मॅचेस’
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांना झेल टिपण्याचा चांगला सराव दिला. तब्बल ९ फलंदाज झेलचीत झाले. एकच फलंदाज (स्टीव्हन फिन) त्रिफळाचीत झाला. ज्यो रूटने तीन कॅचेस घेतल्या. ऍलिस्टर कुक आणि बेन स्टोक्सने प्रत्येक दोन तसेच यष्टिरक्षक इयन बटलर, इयन बेलने प्रत्येकी एक झेल टिपला.
कसोटी इतिहासातील ऑस्ट्रेलियाची ही सातवी नीचांकी धावसंख्या ठरली. तसेच गेल्या ७९ वर्षातील दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची केपटाऊन कसोटीतील ४७ धावा ही ऑस्ट्रेलियाची आजवरची नीचांकी धावसंख्या आहे. ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलियावर २१ किंवा त्याहून कमी धावांत निम्मा संघ गारद होण्याची नामुष्की तब्बल ७५ वर्षानी ओढवली. केवळ २५ चेंडूंमध्ये पाच विकेट गमावण्याची वेळ पाहुण्यांवर २००३नंतर प्रथमच आली. पाहुण्यांचा पहिला डाव १०० मिनिटांत संपला.
ख्रिस रॉजर्स प्रथमच शून्यावर बाद झाला. ४६व्या डावात तो खातेही उघडू शकला नाही.
** ब्रॉडचे विकेटचे ‘त्रिशतक’
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ख्रिस रॉजर्सला ऍलिस्टर कुककरवी झेलबाद करत वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये तीनशे विकेटचा टप्पा पार केला. ३००हून अधिक विकेट घेणारा तो इंग्लंडचा पाचवा गोलंदाज आहे. ८३ कसोटीत ब्रॉडने विकेटचे ‘त्रिशतक’ साजरे केले. सामन्यात १० विकेट घेण्याची करामत त्याला दोनदा साधता आली आहे. १७ वेळा ब्रॉडने पाचहून अधिक विकेट घेतल्यात. चौथ्या कसोटीत आठ विकेट घेताना वैयक्तिक नव्हे तर इंग्लंडतर्फे सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवताना माजी गोलंदाज फ्रेड ट्रूमन यांना (३०७ विकेट) मागे टाकले.
***ब्रॉडचा अनोखा ‘स्पेल’
९.३-५-१५-८
पहिले षटक १० धावा, दोन विकेट (रॉजर्स ०, स्मिथ ६)
दुसरे षटक निर्धाव (मेडन) षटक आणि विकेट (मार्श ०)
तिसरे षटक निर्धाव षटक आणि विकेट (वोग्ज १)
चौथे षटक निर्धाव षटक आणि विकेट (क्लार्क १०)
पाचवे षटक २ धावा
सहावे षटक ३ धावा
सातवे षटक १ धाव, २ विकेट (स्र्टाक १, जॉन्सन १३)
आठवे निर्धाव षटक
नववे निर्धाव षटक
दहावे ४ धावा आणि विकेट (लियॉन ९)