नवी मुंबई शहराचे नशिब बलवत्तर आहे. सातत्याने केंद्र व राज्य शासनाकडून बक्षिसांचाच वर्षाव होत आहे. अर्थात हे पुरस्कार कोणत्या निकषावर दिले जात आहेत अथवा खरोखरीच नवी मुंबईच्या कानाकोपर्याची पाहणी करतात अथवा नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. अनधिकृत होर्डीगचे वाढते प्रस्थ, अजूनही हागणदारीमुक्त न झालेली नवी मुंबई यासह अनेक बाबी भयावह स्वरूपात असतानाही नवी मुंबई शहराला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये राज्यात प्रथम क्रमाकांचा दोन वेळा पुरस्कार मिळतो काय, देशामध्ये स्वच्छ व सुंदर शहरामध्ये नवी मुंबईला तिसर्या क्रमाकांचे शहर म्हणून निवड होते काय? सर्व काही आश्चर्यजनकच प्रकार असून पुरस्कार वितरणाच्या निकषावरच संशय निर्माण होतो. एकूणच काय ‘आधंळ दळतंत अन् कुत्रं पिठ खातंय’ अशातला हा प्रकार आहे. काही वर्षापूर्वी शैक्षणिक क्षेत्रात शाळांना अनुदान चालविण्यासाठी ‘पटसंख्येचा’ घोटाळा करावा लागल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. नवी मुंबई शहराचा कारभार हाकणार्या नवी मुंबई महापालिका प्रशासनातही सङ्गाई कामगार विभागात गेल्या अनेक वर्षापासून असाच ‘पटसंख्येचा’ घोटाळा सुरू असल्याचे बोलले जात आहे आणि अनेक ठिकाणी पहावयासही मिळत आहे. नवी मुंबईकरांचे दुर्दैवं असे की हा प्रकार सर्वपक्षीय राजकारण्यांना माहिती असून सर्वच राजकीय घटक या प्रकाराकडे कानाडोळा करत आहेत. महापालिका प्रशासनाच्या सफाई कामगारांचा आकडा कागदोपत्री कितीही मोठा असला तरी प्रत्यक्षात रस्त्यावर सफाईचे काम करणार्या कामगारांची संख्या नगण्यच आहे. काम न करताही कंत्राटदाराच्या आणि त्या त्या विभागातील स्थानिक राजकारण्यांच्या आशिवार्र्दाने वेतन घेणार्या सफाई कामगारांची संख्या लक्षणीय आहे. आज नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे विकासकामे करण्यासाठी निधी उपलब्ध नाही. सर्वसामान्य करदात्या नवी मुंबईकरांकडून जमा होणार्या कराच्या निधीतून महापालिकेची विकासकामे आणि महापालिका कर्मचार्यांचे (कंत्राटी व कायम) वेतन करण्यात येत आहे. मग काम न करता वेतन घेणार्या सफाई कामगारांचे चोचले नवी मुंबईकरांनी का म्हणून पुरवायचे? स्थानिक राजकारण्यांना ईतकाच काम न करता वेतन घेणार्या सङ्गाई कामगारांचा पुळका येत असेल तर त्यांनी आपल्या खिशातून या सङ्गाई कामगारांचे वेतन द्यावे. काम न करता वेतन घेणार्या सफाई कामगारांचा आणि त्यांच्या या कृत्यावर स्वत:च्या स्वार्थासाठी पांघरून घालणार्या राजकारण्यांना यापुढे आणखी किती काळ साथ द्यायची याचा आता खर्या अर्थांने नवी मुंबईकरांनी विचार करण्याची योग्य वेळ आलेली आहे. आपण घाम गाळायाचा आणि महापालिका प्रशासनाला कर भरायचा. या कराचा विनियोग होतो काय, तर रस्त्यावर कधीही झाडू न मारणार्या, सफाईचे काम न करणार्या सफाई कामगारांना वेतन देण्यासाठी करापैकी काही निधी खर्च करायचा. हे काय गौडबंगाल आहे. काम न करता वेतन घेणारे सङ्गाई कामगार या नवी मुंबई शहराचे जावई आहेत काय? हे प्रकार थांबविण्यासाठी आता नवी मुंबईकरांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. हे शहर आपले आहे. आपल्या कुटूंबाप्रती आपली जशी जबाबदारी आहे, तशीच या शहराप्रतीदेखील आपलीदेखील काही नैतिक जबाबदारी आहे याचे भान प्रत्येक नवी मुंबईकरांने ठेवणे आवश्यक आहे.
वेळात वेळ काढून रस्त्यावर जाणार्या सफाई कामगारांचा कानोसा घेवून पाहा. प्रभागात दिसणार्या अस्वच्छतेबाबत आपण सफाई कामगारांच्या नावाने बोटे मोडतो. पण रस्त्यावर झाडू मारणार्या सफाई कामगारांशी प्रेमाने चर्चा करा. मग महाभयावह परिस्थिती आपल्या निदर्शनास येईल. ठेकेदाराकडे कागदावर किती काम करत आहेत आणि प्रत्यक्षात रस्त्यावर किती काम करत आहेत, याची आपणास कल्पना येईल. काम न करता वेतन घेणार्या सफाई कामगारांचे काम अन्य सफाई कामगारांनाच करावे लागत असल्याने त्यांच्यावर या अतिरिक्त कामाचा ताण वाढत असल्याने त्यांना मानसिक तणावाखाली काम करावे लागत आहे. काम न करता वेतन घेणार्या सफाई कामगारांना स्थानिक राजकारणी व ठेकेदारांचा आशिर्वाद असल्याने याबाबत कोणाकडे तक्रार करूनही काम करणार्या सफाई कामगारांना अनुभवाअंती समजले आहे. त्यामुळे हा प्रकार फोफावला आहे. पण आता हे सर्व थांबले पाहिजे. सुशिक्षित नवी मुंबईकरांनी फेसबुक, व्हॉट्सअप या सोशलमिडीयावरून या सफाई खात्यातील ‘पटसंख्येचा झोल’ आता घराघरातील नवी मुंबईकरांच्या निदर्शनास आणून दिला पाहिजे.
नवी मुंबई शहराला काही वर्षापूर्वी राज्यात संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमाकांचे दोन वेळा पारितोषिक मिळाले होते. याचा नवी मुंबईकरांना निश्चितच अभिमान असणार. परंतु या पुरस्काराचे श्रेय होते ते खर्या अर्थांने सफाई कामगारांचे. बाराही महिने प्रतिकूल-अनुकूल हवामानाची पर्वा न करता रस्ते सङ्गाई करणार्या, गटारांची सङ्गाई करणार्या सङ्गाई कामगारांमुळेच नवी मुंबई शहरामध्ये स्वच्छता दिसून येत आहे. शैक्षणिक क्षेत्रात ज्याप्रमाणे काही वर्षापूर्वी ‘पटसंख्येचा’ घोटाळा उघडकीस आला होता, त्याचधर्तीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनातही सङ्गाई कामगार विभागात ‘पटसंख्येचा’ घोटाळा महापालिका स्थापनेपासून सुरू आहे. या प्रकारावर सङ्गाई कामाचे ठेके घेणारे ठेकेदार आणि त्या त्या विभागातील मातब्बर राजकारणी यांच्या ‘मधुर’ संगणमताने पांघरूण घातले जात आहे. महापालिका अधिकार्यांनादेखील या सङ्गाई कामगार ‘पटसंख्येचा’ घोटाळा माहिती असतानाही ‘नरो वा कुंजरो’ या भूमिकेतून त्यांनीही वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या प्रकाराकडे कानाडोळा केला आहे आणि आजही करतच आहे.
नवी मुंबई हे आपले शहर आहे. आपल्या करातून उपलब्ध होणार्या निधीतून या शहराचा कारभार चालविला जात आहे. गुन्हा होत असताना त्या गुन्ह्याप्रती बघ्याची भूमिका घेणारेदेखील तितकेच गुन्हेगार असतात. निवडणूका आल्यावर प्रचारादरम्यान आपल्या परिसराचा कळवळा असल्याचा आव आणतात. पण निवडणूका झाल्यावर आपणास काय दिसून येते. त्यांच्याच अनधिकृत होर्डीगने परिसराला बकालपणा तर येतोच, पण ज्यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवायचा, त्याच कामगारांना सोबत घेवून राजकारणी विभागात फिरतात. या गोष्टी परिसरातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असते. याचा लेखाजोखा विभागिय जनता नक्कीच ठेवत असते. सफाईचे काम न करता स्थानिक राजकारण्यांच्या आशिर्वादाने व ठेकेदाराच्या मेहेरबानीने वेतन घेणार्या सफाई कामगारांची संख्या दिवसेंगणिक वाढत चालली आहे. या वर्गात मोडणारे सफाई कामगार राजकारण्यांच्या मागेपुढे फिरत असल्याने सफाईचे ठेका चालविणारे ठेकेदारही दुर्दैवाने हतबल झालेले पहावयास मिळतात. राजकारणी काम न करता वेतन घेणार्या सफाई कामगारांना वर्षानुवर्षे आश्रय देवू लागल्याने ठेकेदारही आपली माणसे कागदावर दाखवून काम न करता त्यांचे प्रशासनाकडून पैसे काढू लागले असल्याची माहिती सफाई कामगारांकडून देण्यात येत आहे.
मध्यंतरी नगरसेवकांच्या अथवा मातब्बर राजकारण्यांच्या घरी सफाई कामगार सफाईचे काम करण्याचे प्रकरण वर्तमानपत्रातून गाजले होते. पण हा प्रकार आजही थांबलेला नाही. सुरूच आहे. शैक्षणिक क्षेत्राप्रमाणेच नवी मुंबई महापालिकेतील सफाई खात्यामध्येही ‘पटसंख्येचा’ घोळ सुरू आहे. वास्तवात कागदोपत्री किती सफाई कामगार आहेत, प्रत्यक्षात रस्त्यावर किती सफाई कामगार काम करत आहेत? याची खातरजमा प्रत्येक नवी मुंबईकराने आरटीआय टाकून करणे आवश्यक आहे. आपल्या पैशाचा विनियोग काम न करणार्या सफाई कामगारांच्या वेतनावर वर्षानुवर्षे होत असेल तर याला जबाबदार कोण? ठेकेदार का त्या सफाई कामगारांची पाठराखण करणारे राजकारणी, या वादात न पडता तुम्ही-आम्ही सर्वच नवी मुंबईकरच या प्रकाराला खर्या अर्थांने जबाबदार आहोत. हा प्रकार थांबलाच पाहिजे.
नवी मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांचा ‘पटसंख्येचा’ घोळ आणि काम न करता वेतन घेणार्या सफाई कामगारांची मुजोरशाही मोडीत काढण्यासाठी खासदार राजन विचारे, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. हा प्रकार थांबावा ही मनोमन ईच्छा आहे. नवी मुंबईकरांमध्ये जनजागृती व्हावी आणि सफाई खात्यातील ‘पटसंख्येचा’ घोळ संपुष्ठात यावा यासाठी नवी मुंबईकरांनी आता डोळस होणे काळाची गरज आहे.
– संदीप खांडगेपाटील