नवी मुंबई ः महाराष्ट्र राज्य शासनाच्या आवाहनानुसार नवी मुंबई महापालिकेने सुरु केलेल्या नवी मुंबई शहर स्वच्छता अभियानची सुरुवात महापालिका आरोग्य परिरक्षण आणि वैद्यकीय सहाय्य समिती सभापती सौ. पुनम मिथुन पाटील यांच्या हस्ते 11 ऑगस्ट रोजी बेलापूर-शहाबाज प्रभाग-106 मध्ये करण्यात आली.
बेलापूर गावातील श्रीराम मारुती मंदिर समोरील सार्वजनिक मुख्य रस्त्यावर पडलेला घनकचरा आणि प्लास्टिक पिशव्या वेचून तसेच रस्त्याची साफसफाई हाती झाडू घेऊन करुन महापालिका आरोग्य समिती सभापती सौ. पुनम पाटील यांनी नागरी स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर महापालिका बेलापूर विभाग कार्यालयातील मुख्य स्वच्छता निरीक्षक सुनील सगणे यांनी साफसफाई कर्मचार्यांमार्फत बेलापूर गाव-शहाबाज मधील मुख्य रस्ते, गल्ली-बोळे झाडून घनकचरा गोळा केला.
याप्रसंगी बेलापूर मधील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक अमित रमेश पाटील,युवा नेते मिथुन पाटील, इरफान पटेल, रुपेश दिवेकर, मनोज म्हात्रे, हरिश कोळी, मन्सूर खान, सुरेश पाटील, सौ. साक्षी पाटील, सारीका टोले, दिप्ती पाटील, छाया बंदरे आदींसह बेलापूर-शहाबाज मधील नागरिक, महिला, तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य म्हणजे मनुष्याची धनसंपदा आहे. आपले आरोग्य चांगले, निरोगी ठेवायचे असेल तर आपले घर, कार्यालय आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. मानवी आरोग्य सार्वजनिक स्वच्छतेने चांगले राहते, असे मनोगत यावेळी महापालिका आरोग्य समिती सभापती सौ. पुनम पाटील यांनी व्यक्त केले.
बेलापूर गांव-शहाबाज प्रभाग स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मधील सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन आपणास सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी महापालिका आरोग्य समिती सभापती सौ. पुनम पाटील यांनी केले.
सौ. पुनम पाटील यांनी महापालिका आरोग्य समिती सभापतीपदी निवड झाल्यानंतर बेलापूरमध्ये स्वच्छता मोहिम हाती घेतल्याने यापुढे बेलापूर-शहाबाज प्रभाग नेहमी स्वच्छ राहील. स्वच्छता मोहिम राबविण्याचा सौ. पुनम पाटील यांचा उपक्रम स्वच्छतादायी आहे, अशी प्रतिक्रिया बेलापूर-शहाबाज मधील नागरिकांनी व्यक्त केली.