मुंबई : मुंबईची ‘लाइफ लाइन’ म्हणून ओळखली जाणारी रेल्वे तोट्यात जाऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हा तोटा रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन एका अजब प्रस्तावावर विचार करत आहे. या प्रस्तावानुसार फास्ट आणि स्लो लोकलसाठी तिकिटाचे दर वेगवेगळे आकरण्यात यावेत असले म्हटले आहे.
मुंबई रेल्वे विकास कॉरपोरेशन (एमआरव्हीसी)कडून हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे वृत्त मुंबई मिररने प्रसिद्ध केले आहे. मुंबईतील दळणवळणांच्या साधनांमध्ये उपनगरीय रेल्वेवर सगळ्यात मोठा भार आहे. त्यासोबत बेस्ट बस, मोनो, मेट्रो यांचाही वापर करण्यात येतो. मात्र उपनगरीय रेल्वेचा दर सगळ्यात कमी आहे, असे एमआरव्हीसीच्या प्रस्तावात म्हटले आहे.
उपनगरीय रेल्वे प्रती किलीमीटर ५० पैसे इतका तर आकारते. त्याच वेळी मेट्रो प्रती किमी ५ रुपये, मोनोरेल्वे १.६७ रुपये आणि बेस्ट ४ रुपये मोजते. म्हणजे उपनगरीय रेल्वेचा दर हा सगळ्यात कमी आहे, असेही या प्रस्तावात म्हटले आहे.
उपनगरीय रेल्वेचा तोटा सातत्याने वाढत चालला असून २०१४-१५ मध्ये रेल्वेला १४०० कोटीचा तोटा झाला होता. हा तोटा भरून काढण्यासाठी रेल्वे प्रशासन वेगवेगळ्या पर्यांचा विचार करत आहे.
मुंबईत सध्या उपनगरीय रेल्वेच्या २९२३ फेर्या होतात. यापैकी मध्य रेल्वेवर १६१८ (२४५ फास्ट) फेर्या, तर पश्चिम रेल्वेवर १३०५ (४६६ फास्ट) फेर्या सुरू आहेत. नवीन फेरी सुरू झाली की खर्चही मोठ्या प्रमाणात वाढत जातो असेही यात म्हटले आहे. वर्ष २००४-०५ मध्ये एक १२ डब्बा गाडी धावण्यासाठी ५२.७३ लाख रुपये इतकी खर्च यायचा. जो खर्च २०१३-१४ मध्ये ९७.१४ लाख रुपये इतका आहे, असेही कारण हा प्रस्ताव पुढे आणताना म्हटले आहे.