नवी मुंबई : कामोठे नगरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी विकसित करण्यात येत असलेल्या विरंगुळा केंद्राचा विकास 5 महिन्यांत पूर्ण करुन येत्या 26 जानेवारी 2016 रोजी याचा लोकार्पण सोहळा आयोजित करु असे प्रतिपादन सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी केले.
15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता कामोठे सेक्टर 20 मधील सार्वजनिक उद्यानात विकसित करण्यात येत असलेल्या विरंगुळा केंद्राच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी भाटिया बोलत होते. या प्रसंगी कामोठे ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष एन. एस. करंदीकर, महासचिव बी. जी. वाघमोडे, कार्याध्यक्ष आर. के. राऊत, सिडकोचे मुख्य अभियंता श्री. केशव वरखेडकर, अतिरिक्त मुख्य अभियंता ब्रिजेश शमी, अधिक्षक अभियंता किरण फणसे, अतिरिक्त मुख्य वास्तुतज्ज्ञ श्रीमती रेखा धर प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या भाषणात भाटिया पुढे म्हणाले की, कामोठेतील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन एक सामाजिक संस्था स्थापन केली ही खरोखरच अभिनंदनीय बाब आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसारच हे विरंगुळा केंद्र विकसित केले जाणार आहे. कामोठे नगरात असेच आणखी एक विरंगुळा केंद्र ही विकसित केले जाणार आहे. नवी मुंबईतील विविध नोडसधील सार्वजनिक उद्यानात विरंगुळा केंद्र विकसित करण्यात येणार आहे त्याची सुरुवात आम्ही कामोठे नोड पासून करित आहोत. या विरंगुळा केंद्राचा नागरिकांनी यथोचित उपयोग करावा आणि सामाजिक उपक्रम, ध्यान धारणा कार्यक्रम आणि रिक्रीएशनल क्टीव्हीटी व वाचनालय यासाठी याचा वापर व्हावा असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी बोलतांना ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष एन. एस. करंदीकर म्हणाले की सिडकोने ज्येष्ठ नागरिकांची विनंती मान्य करून एका नव्या पर्वास सुरुवात केली आहे. नवी मुंबई हे तरुणांचे शहर असले तरी येथे ज्येष्ठ नागरीकांची संख्याही मोठी आहे. त्यांना रस्त्यावर किंवा खुल्या मैदानात जमण्याऐवजी असे विरंगुळा केंद्र उपलब्ध झाल्यास त्याचा यथोचित उपयोग होईल असेही मत त्यांनी व्यक्त केले.
प्रारंभी करंदीकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले तर भाटिया यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. या भूमिपूजन समारंभानिमित्त उद्यान परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे अधिकार्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी केले. या विरंगुळा केंद्रात सामायिक कक्ष, ध्यान कक्ष, वाचनालय आणि प्रसाधनगृह यांचा समावेश असेल.