मुंबई : बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी पाचवर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला पुन्हा एकदा 30 दिवसांच्या पॅरोलची रजा मंजूर झाली आहे. जून महिन्यात पॅरोलच्या रजेसाठी अर्ज करताना संजयने मुलीच्या आजारपणाचे कारण दिले होते.
दोन दिवसांपूर्वी पुणे विभागीय आयुक्तांनी संजयचा पॅरोलचा अर्ज मंजूर केला. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढच्या दोन दिवसात संजयची तुरुंगातून सुटका होईल. तीस दिवसांच्या या पॅरोलमध्ये 60 दिवसांपर्यंत वाढ होऊ शकते म्हणजे पुढचे तीन महिने संजय तुरुंगाबाहेर राहू शकतो.
मे 2013 मध्ये संजय उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात गेला. तेव्हापासून संजयने आतापर्यंत कायदेशीर आधार घेऊन 146 दिवस तुरुंगाबाहेर काढले आहेत. ऑक्टोंबर 2013 मध्ये संजयला फर्लोनची रजा मिळाली त्यात त्याला 14 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर जानेवारी 2014 मध्ये त्याला 30 दिवसांची पॅरोलची रजा मंजूर झाली. ती आणखी दोन महिने वाढवण्यात आली.
डिसेंबर 2014 मध्ये त्याला पुन्हा 14 दिवसांची फर्लोनची रजा मंजूर करण्यात आली. ती रजा वाढवण्यासाठी संजयने अर्ज केला होता. मात्र त्यावर जोरदार टीका झाल्यानंतर संजयचा अर्ज नामंजूर करण्यात आला.
गृहखात्याच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार फर्लोन हा कैद्याचा अधिकार आहे. ज्यात कैद्याला वर्षातील 28 दिवसांची रजा मिळू शकते. पॅरोल अपवादात्मक परिस्थितीत मंजूर केला जातो. पॅरोल तीस दिवसांसाठी दिला जातो. ज्यात 60 दिवसांपर्यंत वाढ होऊ शकते. नैसर्गिक आपत्ती, कैद्याचे आजारपण किंवा कुटुंबियांचे आजारपण या परिस्थितीत कैदी पॅरोलच्या रजेसाठी अर्ज करु शकतो.