मुंबई : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, दुष्काळग्रस्त शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी, शेतकर्यांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन करत राज्यभर दुष्काळ यात्रा काढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि सरकारच्या वर्षपूर्तीला युतीतील तणाव यावर पवार यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
राज्यात सरकार चालेल की नाही माहिती नाही, पण टिकेल. मात्र राज्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी शिवसेना स्वत:चेच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्य सरकारने दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष केले असून दुष्काळग्रस्त भागाला कोणतीही ठोस मदत केलेली नाही.
दुसरीकडे अन्न सुरक्षा योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आणि विद्यार्थ्यांची फी देखील भरण्यात आलेली नाही. यामुळे शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन करत राज्यभर दुष्काळ यात्रा काढणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली.
शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असे वाटत नाही. एकूणच सरकार चालेल की नाही माहिती नाही पण टिकेल. समजा काही कारणाने युती तुटलीच तरी सुरुवातीला घेतलेली भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका आता राष्ट्रवादी काँग्रेस कधीही घेणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
कापूस-सोयाबीनला अद्याप दर मिळत नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी शेतकर्यांची फसवणूक केली आहे. कसुरी यांच्या कार्यक्रमासंदर्भात जे घडले ते अशोभनीय असून भाजपाला जबाबदारी टाळता येणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.