मुंबई- मी कालही भारत माता की जय म्हटलं आजही म्हणेन आणि उद्याही म्हणेन आणि संपूर्ण भारत हेच म्हणले अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावून सांगत माफी मागण्यास स्पष्ट नकार दिलाय. तसंच माझं मुख्यमंत्रिपद जरी गेलं तरी भारत माता की जय म्हणणारच असंही मुख्यमंत्र्यांनी बजावलं. भारत माता की जय मुद्यावरुन विधानसभेत आज मुख्यमंत्र्यांचं आक्रमक रुप पाहण्यास मिळालंय.“देशात राहायचं तर भारत माता की जय म्हणावंच लागेल” असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या जाहीर सभेत केलं होतं. त्यांच्या विधानामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यांच्या या विधानाचे विधानसभेतही पडसाद उमटले. भारत माता की जय विधानावर मुख्यमंत्र्यांना सभागृहात निवेदन द्यावं लागलं. पण, त्यावेळेस विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला आणि अल्पसंख्याकांची माफी मागावी अशी मागणी केली.परंतु, हा धार्मिक मुद्दा नाही. अशा विषयांवर चर्चा करुन सभागृहाचा वेळ घालून नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. पण, विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आक्रमक होतं विरोधकांवर तुटून पडले. मुळात हा धार्मिक मुद्दाच नाहीये. काही लोकं हा मुद्दा धरून देशात विभाजनाचं बीजारोपण करायचंय. सीमेवरचा जवान भारत माता की जय म्हणत देशाचं रक्षण करतोय त्याच्या मनावर अशा राजकारणामुळे काय परिणाम झाला असले. ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भारत मातेचा जयघोष केला त्यांच्या मनावर आज काय परिणाम झाला असेल याचा विचार करण्याची गरज आहे. विनाकारण या विषयाचं राजकारण केलं जात आहे. पण, स्पष्टपणे सांगतो मी, कालही भारत माता की जय म्हटलं आजही म्हणेन आणि उद्याही म्हणेन आणि हेच संपूर्ण भारत म्हणेन अशा शब्दात मुख्यमंत्र्यांना विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं.मुख्यमंत्र्यांचा निवेदनावर विरोधकांचं समाधान झालं नाही. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांनी ‘भारत माता की जय’ हे मुख्यमंत्री म्हणून म्हटलं की एक संघाचा कार्यकर्ता म्हणून म्हटलं हे आधी स्पष्ट करावं. देशात कुणी राहावं कुणी राहू नये हे ठरवण्याचा अधिकार संघाला दिलेला नाही. कुणी जय हिंद म्हटलं तर यांना पटत नाही. मग कुणी भारत राहु नये हे ठरवण्याचा अधिकार यांना कुणी दिला असा पलटवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.यावर मुख्यमंत्र्यांनी आक्रमक होत उत्तर दिलं. मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे. संघामध्ये मला राष्ट्रवाद शिकवलाय. आणि भारत माता की जय हे राज्यघटनेच्या चौकटीच्या आधाराचे म्हटलोय. जर कुणाला देशाबद्दल अभिमान नसेल तर अशा लोकांना भारतात राहण्याचा काय अधिकार आहे आणि या विधानात काय चुकीचं आहे असं प्रत्त्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसंच भारत माता की जय म्हणणं यात गैर काय आहे. पण, विरोधकांकडून हायकमांडच्या आदेशानुसार राजकारण केलं जात आहे. याच सभागृहात एक सदस्य भारत माता की जय म्हटला नाही तेव्हा सर्व पक्षाचे सदस्य एकवटले होते आणि त्याला निलंबित केलंय. त्यामुळे मी भारत माता की जय म्हटलो म्हणून अल्पसंख्याकांची माफी का मागावी. उलट विरोधकांनी याचं राजकारण केलंय म्हणून त्यांनीच अल्पसंख्याकांची माफी मागावी अशी उलट मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. माझं मुख्यमंत्री असो अथवा नसो पण मी भारत माता की जय म्हणणारच अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना बजावलं.