नवी मुंबई: दिघा येथील इलठणपाडा लगत असलेल्या तलावात मित्रांसोबत पोहोण्यासाठी गेलेल्या स्वप्नील चौधरी (17) या तरुणाचा सदर तलावात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना 12 मे रोजी सायंकाळी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री उशीरापर्यंत तलावात बुडालेल्या स्वप्नीलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. 13 मे रोजी सकाळी स्वप्नीलचा मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागला.
या घटनेतील मृत स्वप्नील चौधरी ठाण्यातील विटावा भागात राहण्यास होता. नुकताच तो अकरावी पास होऊन बारावीत गेला होता. 12 मे रोजी सायंकाळी स्वप्नील आपल्या चार मित्रांसह दिघा इलठणपाडा लगतच्या तलावात पोहोण्यासाठी गेला होता. यावेळी तलावात स्वप्नीलसह त्याचे सर्व मित्र पोहोण्यासाठी उतरले. मात्र, स्वप्नीलला पोहोता येत नसल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्यातच तो पाण्यात बुडाला. सदर बाब त्याच्या मित्रांना लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वप्नीलला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे मित्रांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर स्वप्नीलच्या कुटुंबियांनी आग्नशमन दलासह घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी आग्नशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या स्वप्नीलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वप्नील तलावाच्या गाळात रुतून बसल्यामुळे त्याला बाहेर काढण्यात आग्नशमन दलाला यश आले नाही. 13 मे रोजी सकाळी स्वप्नीलचा मृतदेह पाण्यावर आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कोडग यांनी दिली. रबाले एमआयडीसी पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्युची नोंद करुन याप्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.