नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पाया कायमस्वरूपी भक्कम करणेसाठी तसेच, विविध कामानिमित्त राज्यातून मुंबई किंवा मुंबई उपनगरात येणाऱ्या जनतेला हक्काचे असे तात्पुरते निवासस्थान म्हणून प्राप्त होण्याच्या दृष्टीने, आपल्या शहरात ‘महाराष्ट्र भवना’ची निर्मिती होणे आवश्यक असल्याचे मत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे. वाशी येथील सिडको आरक्षित व नियोजित ‘महाराष्ट्र भवन’ भूखंडाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपले मत मांडले.
नवी मुंबईतील स्थानिकांच्या जमिनी संपादित करून, सिडकोमार्फत नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली. तसेच, शहराची उभारणी करताना आणि मुंबईपासून काही अंतरावरच उभारण्यात येणाऱ्या शहराला देशातील सर्व राज्य समभावाची ओळख देणे सिडकोला आवश्यक आणि गरजेचे होते. म्हणून, त्या-त्या राज्याच्या संस्कृतीचा प्रातिनिधिक स्वरूपातील ठेवा जोपासण्यासाठी सिडकोने वाशी रेल्वे स्थानकाजवळच असणाऱ्या सेक्टर 30 ए येथे राज्यनिहाय भवन निर्मितीसाठी देशातील बहुतांश राज्य सरकारांना भूखंड उपलब्ध करून दिले. सदर, भूखंडांवर बहुतांश राज्यांच्या भवन इमारती सन्मानाने उभ्या आहेत. परंतु, या सर्वामध्ये नियोजित ‘महाराष्ट्र भवन’साठीचा सिडकोने १९९८ साली आरक्षित केलेला सुमारे आठ हजार स्क्वेअर मीटरचा भुखंड आजतागायत मोकळाच असून, ह्या भुखंडाचा वापर सिडको मार्फत वाहन पार्किंगसाठी किंवा विविध महोत्सवांसाठी करण्यात येतो. याची, राज्यातील नागरिक म्हणून नवी मुंबईकरांसमवेतच आपणासही खंत असल्याची बाब आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान व्यक्त केली.
सिडकोने आरक्षित केलेल्या ह्या भुखंडावर राज्य शासनाच्या माध्यमातून नियोजित ‘महाराष्ट्र भवन’ उभारल्यास विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातून मुंबई येथे शासकीय अथवा तत्सम कामासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाला हक्काचे असे क्षणभर विसावा घेण्यासाठी शासकीय विश्राम गृह प्राप्त होईल. तसेच, सदर भवनात स्थानिक प्रकल्पग्रस्त व इतर महिला मंडळे, बचतगट यांच्या उत्पादनांना बाजारपेठही उपलब्ध करून महिलांना आर्थिकरीत्या सक्षम बनविण्याचा माझा उद्देश असल्याचेही आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. ह्या भुखंडावर नियोजित ‘महाराष्ट्र भवन’ उभारणीच्या जनकार्यास लवकरात लवकर प्रारंभ होणेहेतू ‘मी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करीत असून, माझ्या कार्यकाळातच ‘महाराष्ट्र भवन’ नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे ठाम मत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी याप्रसंगी व्यक्त केले आहे. ह्या पाहणी दौऱ्यास आमदार मंदाताई म्हात्रे यांसोबत सिडकोचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत सामदसानी, भाजपचे पदाधिकारी डॉ. राजेश पाटील, गोपाळराव गायकवाड, श्रीराम घाटे, संतोष पळसकर, दामोदरन पिल्ले, प्रमिला खडसे व इतर शहरस्तरीय तथा विभागस्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.