अनंतकुमार गवई
नवी मुंबई ः मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केट मंगळवारी, दि. १२ जुलै रोजी बंद होते. त्यामुळे फळ, भाजीपाला मार्केटला गराडा घालून बसणारे फेरीवाले गायब झाले होते. याशिवाय बाजार समिती परिसरात बंदमुळे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाजार समिती मार्केटमधील फळ आणि भाजी मार्केटच्या जावक गेट लगत नवी मुंबई महापालिकेच्या पदपथावर फळ मार्केट पासून ते भाजी मार्केटपर्यंत फेरीवाले बसतात. यामुळे या दोन्ही मार्केटमध्ये येणार्या पादचार्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. पादचार्यांना बर्याचदा रस्त्यावरून चालणे भाग पडते. मार्केट लगतचा रस्ता तीन लेनचा असताना एक ते दिड लेन रिक्षावाल्यांनी व्यापल्याने केवळ एक ते दिड लेन वाहतुकीसाठी मोकळी असते. मात्र, मार्केट मधून बाहेर पडणार्या ट्रक, टेंम्पोची संख्या इतकी असते की फळ आणि भाजीपाला मार्केट गेटवर दुपारपर्यंत वाहतूक कोंडी असते. त्यात आणखी भरीस भर म्हणून पदपथावर फेरीवाले बसत असल्याने पादचारी रस्त्यावरून चालू लागल्याने आणखी वाहतूक कोंडी होऊन वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडत असतो. मार्केट लगत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी एपीएमसी वाहतूक पोलीस जीव तोडून प्रयत्न करत असतात. मात्र, अनधिकृत फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षा चालकांमुळे वाहतूक पोलिसांचे घोडे नेहमीच अडून जात असल्याचे चित्र पहावयास मिळते.
फळ आणि भाजी मार्केट लगत बसणार्या फेरीवाल्यांच्या विरोधात वारंवार महापालिका तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे यांच्याकडे तक्रार करूनही थातूरमातूर कारवाई पलिकडे काहीच होत नाही. पालिकेने कानाडोळा केल्यानेच मार्केट परिसराला बाराही महिने फेरीवाल्यांचाच विळखा पहावयास मिळायचा. त्यामुळे वाहतूक पोलीसही हतबल झाले आहेत. आता, फळ आणि भाजी मार्केट लगत बसणार्या फेरीवाल्यांकडे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीच लक्ष घालून वाशी सेक्टर-९ परिसराप्रमाणे एपीएमसी परिसर कायमचा फेरीवाला मुक्त करून पादचार्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, १२ जुलै रोजी बाजार समिती आवारातील मार्केट मधील कांदाबटाटा, फळ आणि भाजीपाला आदी तिन्ही मार्केट बंद होती. त्यामुळे कांदा-बटाटा, फळ आणि भाजीपाला मार्केट परिसर फेरीवाला मुक्त झाला होता. त्यामुळे पादचार्यांनी समाधान व्यक्त केले.