अमोल इंगळे
नवी मुंबई : सारसोळे गावातील महापालिका शाळेलगत संरक्षक भिंतीला लागून असलेले इमारतीचे डेब्रिज तात्काळ उचलण्याची मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सारसोळे गावाकरीता सावित्रीबाई फुले ही महानगरपालिकेची शाळा आहे. या शाळेमध्ये सारसोळे गावातील व नेरूळ सेक्टर सहामधील गोरगरीबांची व अल्प उत्पन्न गटातील रहीवाशांची मुले शिक्षण घेत आहे. या शाळेजवळ असलेली एक इमारत महापालिका व सिडकोने काही वर्षापूर्वी पाडली. इमारत पाडताना जी तत्परता महापालिका प्रशासनाने दाखविली, तीच तत्परता त्या इमारतीचे डेब्रिज उचलताना दाखविली नाही. आजही पालिका शाळेजवळ त्या इमारतीचे डेब्रिज मोठ्या प्रमाणावर पडलेले आहे. या डेब्रिजमुळे सारसोळे गावाला बकालपणा आला असून सारसोळे ग्रामस्थांच्या जिवितालाही धोका निर्माण झाला असल्याचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
पावसाळ्याचे दिवस सुरू असून त्या डेब्रिजमुळे साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. समस्या गंभीर आहे. सारसोळे गावाचा बकालपणा वाढत असून या बकालपणातून सारसोळे गावाची व ग्रामस्थांची सुटका करणे महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. आपण स्वत: या ठिकाणी पाहणी केल्यास आपणास समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल. समस्येचे गांभीर्य पाहून आपण महापालिका शाळेच्या भिंतीलगतच असलेले डेब्रिज शक्य तितक्या लवकर हटविण्याचे महापालिका प्रशासनाच्या संबंधितांना निर्देश द्यावेत व या कामाबाबत काय झाले याचा आढावाही घ्यावा अशी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.