स्वयंम न्यूज ब्युरो
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी सुरू होती. लोकसभा निवडणुकीत झालेले जय-पराजय याविषयीची चर्चा ही सकाळच्या कोअर कमिटीच्या बैठकीत झाली. तसेच वंचित बहुजन आघाडीला आमच्या महाआघाडीत यायचेच नव्हते. तरीही त्यांनी त्यासाठीचे वातावरण तयार करून सर्वांचाच वेळ वाया घालवला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री गणेश नाईक यांनी दिली.
या बैठकीत अनेक उमेदवारांना आलेल्या अपयशावर त्या-त्या मतदारसंघातील उमेदवार आणि प्रतिनिधींनी त्याची कारणे आणि त्यासंदर्भातील माहिती दिली. या माहितीनंतर येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून काय भूमिका ठरवली जाईल, याविषयी चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णय हा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे घेतील, असेही नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
वंचित बहुजन आघाडीला आमच्या महाआघाडीत यायचेच नव्हते. तरीही त्यांनी त्यासाठीचे वातावरण तयार करून सर्वांचाच वेळ वाया घालवला. वंचितमुळे काँग्रेससोबत आम्हालाही मोठा फटका बसला, त्याची माहिती अनेकांनी दिली. त्यामुळे त्यावर चर्चा झाली आणि अनेक विषय समोर आले. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरण यावर चर्चा सुरू आहेत, त्या खोट्या आहेत. तर दुसरीकडे मनसेचा विषय या बैठकीत आला नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री गणेश नाईक यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत तरूण नेतृत्त्वाला संधी दिली पाहिजे, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतल्याचे नाईक यांनी सांगितले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे. विधानसभा निवडणुकीत तरूण नेतृत्त्वाला संधी देऊन पक्षाला नवसंजिवनी देण्याची शक्यता आहे.