श्रीकांत पिंगळे
मुंबई – मध्य, हार्बर मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांची दुरुस्ती तसेच देखभालीसाठी रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यानुसार मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान कल्याण दिशेकडील जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड यार्ड येथे ६ तास जम्बोब्लॉक घेण्यात येईल. मात्र ब्लॉक केवळ यार्डपुरताच असल्याने उपनगरीय लोकल वेळापत्रकानुसार चालविण्यात येतील.
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान कल्याण दिशेकडील जलद मार्गावर रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून कल्याण दिशेकडील जलद मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. माटुंगा ते मुलुंडदरम्यान त्या सर्व स्थानकांवर थांबतील. सकाळी १०.४६ ते दुपारी ३.१८ वाजेपर्यंत ठाण्याहून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथेही थांबतील.
हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते मानखुर्ददरम्यान दोन्ही दिशेकडील मार्गावर सकाळी १० वाजून ३४ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल. या मार्गावर ब्लॉकदरम्यान एकही लोकल धावणार नाही. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात आला नाही. हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्याच तिकीट किंवा पासवर सकाळी १० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्यास परवानगी आहे.
दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई यार्ड येथे रविवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ६ तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र हा ब्लॉक केवळ यार्डपुरताच मर्यादित आहे. त्याचा या मार्गावरील उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पनवेल-मानखुर्द-पनवेल विशेष लोकल
रविवारी सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४४ वाजेपर्यंत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते वाशी, बेलापूर, पनवेल यादरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाºया लोकल रद्द करण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-मानखुर्द-पनवेल विशेष लोकल चालविण्यात येतील.