नवी मुंबई : एम.आय.डी.सी.चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी आज महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला.
मराठवाडा कृषि विद्यापीठातून एम.एस.सी. (ॲग्रीकल्चर) व नेदरलॅंड हेग येथील इन्स्टिट्युट ऑफ सोशल स्टडीजमध्ये सार्वजनिक धोरण आणि व्यवस्थापन (Public policy and Management) या विषयात एम.ए. व्दिपदवीधारक असणारे श्री. अण्णासाहेब मिसाळ हे 2003 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकारी आहेत.
एम.आय.डी.सी. मध्ये सह मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी यापूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी – मुंबई शहर, उप आयुक्त (महसूल) – कोकण विभाग, उपसचिव – मदत पुनर्वसन विभाग, मुद्रांक अधिक्षक मुंबई, मुख्य अधिकारी – झोपडपट्टी सुधार महामंडळ, मुख्य अधिकारी – मुंबई गृहनिर्माण महामंडळ (म्हाडा), मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड, जिल्हाधिकारी धुळे अशा विविध पदांवर लोकाभिमूख कार्य केलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अनेक लोककल्याणकारी धोरण निर्मिती प्रक्रियेत त्यांनी उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.
मुंबई विभागातील करमणुक कराचे धोरण, मुंबईतील स्टँप ड्युटी आणि रजिस्ट्रेशन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी तसेच मुंबई स्टँप ॲक्ट कायद्याची धोरण निर्मिती, महाराष्ट्र राज्यातील विविध गावांतील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन नियोजन धोरण, मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील खारफुटी संरक्षण आणि संवर्धनातून पर्यावरण रक्षण कार्यात सक्रीय सहभाग, मुंबईतील तलाव, उद्याने, पार्क यांचे सुशोभिकरण व विकास प्रकल्पातून पर्यावरण संवर्धन, मुंबईमध्ये झोपडपट्टी विकासाच्या कामांची प्रभावी अंमलबजावणी, म्हाडाचे मुख्याधिकारी म्हणून मुंबई विभागात नागरी गृहनिर्माणाचे विशेष काम, सदनिकांची संगणकीय लॉटरी, रायगड जिल्हा परिषदेत स्वच्छता अभियानासह उल्लेखनीय नागरी सुविधा कामांमध्ये लोकाभिमुख कार्य तसेच जिल्हाधिकारी धुळे म्हणून जलमुक्त शिवार योजनेत अत्युत्कृष्ट काम अशा वैशिष्ट्यपूर्ण कामांमुळे कृतीशील प्रशासकीय अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारताना त्यांनी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी अशा सर्वांना सोबत घेऊन नवी मुंबईकर नागरिकांना अभिप्रेत असलेले अधिक चांगले काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. आधुनिक शहर म्हणून तसेच देशात स्वच्छतेत सातवे मानांकन असलेल्या नवी मुंबईचा नावलौकीक अधिक दर्जेदार नागरी सुविधांची पुर्तता करून वाढविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.