सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
राष्ट्रवादीच्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगतांचा पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा
नवी मुंबई : प्रभागातील नेरूळ सेक्टर १८ परिसरातील मीनाताई ठाकरे दैनंदिन मार्केट, ग्रंथालय व अभ्यासिकेतील समस्या दूर करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभाग ९६ मधील नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर १६,१६ए, १८, १८8 ए व सभोवतालच्या परिसरातील रहीवाशांसाठी मीनाताई ठाकरे दैनंदिन मार्केट, ग्रंथालय, अभ्यासिका निर्माण केली. त्याबाबत महापालिका प्रशासनाचे आभार मानावे व कृतज्ञता व्यक्त करावी, तितकी कमीच आहे. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी डागडूजी करण्यास व समस्या सोडवून सुविधा देण्यास महापालिका प्रशासनाकडून दाखविली जाणारी उदासिनता, केली जाणारी चालढकल यामुळे समस्यांचा उद्रेक झालेला आहे. या इमारतीचा रंग पूर्णपण उडाला असून बकालपणाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. या इमारतीची लवकरात लवकर डागडूजी होणे आवश्यक आहे. छताला गळती लागली असून ठिकठिकाणी पाणी गळत आहे. ओलावा आलेला आहे. या इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार तुटलेले आहे. डागडूजी होणे आवश्यक आहे. या ठिकाणी असलेल्या वॉटर पंपही लिकेज असून याचीही वेळीच दुरूस्ती होणे आवश्यक आहे. या ठिकाणी गटरव्यवस्थाही दुरावस्थेत आहे. येथील खिडक्या तुटल्या असून खिडक्यांची दुरूस्ती करून जाळ्या बसवाव्यात की जेणेकरून डास आतमध्ये प्रवेश करणार नाहीत. याशिवाय त्या ठिकाणी इतरही अनेक समस्या असून त्याचे लवकरात लवकर निवारण होणे आवश्यक आहे. या ठिकाणच्या समस्या सोडवून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याबाबत तात्काळ सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी केली आहे.