संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पदाधिकारी संवाद मेळावा वाशीमध्ये शनिवारी मोठ्या उत्साहात आणि भगव्या जल्लोषात पार पडला. या मेळाव्याला हजारो शिवसैनिक आणि युवासैनिक उपस्थित होते. मेळाव्याला संबोधित करताना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी आगामी निवडणुकीत नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार केला.
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी संवाद मेळाव्याला संबोधित करताना युवासेना सचिव वरुण सरदेसाई म्हणाले की, युवासेना पदाधिकारी मेळाव्यांना राज्यभर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. २७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत मेळावे झाले आहेत. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागातही युवासेना आणि शिवसेनेचे काम चांगल्या पध्दतीने सुरू आहे. युवासेनेचा पहिला नगरसेवक नवी मुंबईतून निवडून आला आहे. त्यामुळे युवासेना आणि नवी मुंबई यांचे आगळेवेगळे नाते तयार झाले आहे. आगामी निवडणुकीत पालिकेवर शिवसेना महाविकास आघाडीचेच वर्चस्व राहणार आहे, असाही विश्वास वरुण सरदेसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
आगामी निवडणुकीनंतर महापालिकेच्या प्रत्येक दालनात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिमा लागणार आहे, असे प्रतिपादन खासदार राजन विचारे यांनी यावेळी केले. तसेच भाजप हा पक्ष मित्रांचा घात करणारा पक्ष आहे. या पक्षाची महाराष्ट्रातील ताकद संपली आहे. त्यामुळे आता त्यांना ईडी आणि सीबीआयचा आधार घ्यावा लागत आहे. फक्त दशहत निर्माण करण्याचे काम आता भाजपच्या माध्यमातून सुरु आहे, अशी टिका यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी केली.
यावेळी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, युवासेना कोरकमिटी सदस्य रुपेश कदम, योगेश निमसे, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, पुनम आगवणे, माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, एम.के. मढवी, शहरप्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे, करण मढवी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात चेतन नाईक, मयुर ब्रीद, सिद्धाराम शिलवंत, मेघाली राऊत यांनी आपले विचारे व्यक्त केले. कोविड वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या प्रतिक्षा माने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. हजारो शिवसैनिकांनी मेळाव्याला हजेरी लावल्याने नाट्यगृहाची आसन व्यवस्था अपुरी पडली. या प्रसंगी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद, या गगनभेदी घोषणा दिल्यामुळे सर्व परिसर दणाणून गेला.