आबा एसीपी : ८३६९९२४६४६
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : एसटी बस संपाबाबत कामगारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी संघटनेचे महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सध्या महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संप सुरू असल्याने प्रवासी वाहतुक विस्कळीत झाल्याचे व प्रवाशांना त्रास होत असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. पण ही परिस्थिती का आली आहे याचेही राज्य सरकारने अवलोकन करणे आवश्यक आहे. आपल्या न्याय्य हक्कासाठी भांडणे व आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडणे हा प्रत्येकाला घटनेने दिलेला हक्क आहे. मांजरीला कोंडीत पकडल्यावर मांजरही नरडीचा घोट घेतेच. एसटी कर्मचाऱ्यांवर वर्षानुवर्ष अन्याय होत असून त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. कमी पगार, अवेळी मिळणारा पगार, अत्यल्प बोनस, अन्य सुविधांचा अभाव असतानाही या कामगारांनी गेली अनेक वर्षे अन्याय सहन करून इमानेइतबारे सेवा केलेली आहे. अन्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तुटपुंजे आहे. एसटी कामगारांची न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने अधिक बोलणे इष्ट ठरणार नाही. तथापि कामगारांवर अन्याय होणार नाही व कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल असा सन्मानजनक तोडगा राज्य सरकारने काढावा अशी मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.