विठ्ठल ममताबादे : Navimumbailive.com@gmail.com
उरणमधील चार गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची तक्रार
३२ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
दामदुप्पट योजनांचे जाळे पुन्हा चर्चेत
आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज
उरण : अल्पावधीत गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून चार गुंतवणूकदारांची तब्बल ७२ लाख ९८ हजार रुपयांची कथित फसवणूक झाल्याचा प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी उरण तालुक्यातील जेएनपीटी टाऊनशिप, पिरकोन आणि करंजा परिसरातील रहिवाशांनी तक्रार दाखल केली असून, कोप्रोली येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिनाभरात पैसे दुप्पट होण्याच्या आशेने गुंतवणूक केलेल्या नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसल्याने उरण-पनवेल परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, संबंधित महिलेने पनवेल येथील ओरियन मॉलमध्ये पहिल्या गुंतवणूकदाराची भेट घेऊन अवघ्या महिनाभरात गुंतवलेली रक्कम दुप्पट करून देण्याचे आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे गुंतवणुकीची मूळ रक्कमही सुरक्षित राहील, असा विश्वास तिने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या आश्वासनाला बळी पडून उरण तालुक्यातील कोंढरीपाडा (करंजा) येथील ३१ वर्षीय व्यक्तीने ८ सप्टेंबर रोजी चार लाख रुपये, तर ९ सप्टेंबर रोजी आणखी ९८ हजार रुपये गुंतवले.
त्यानंतर आणखी तीन जणांनीही या योजनेत लाखो रुपयांची गुंतवणूक केली. अशा प्रकारे चार गुंतवणूकदारांकडून एकूण ७२ लाख ९८ हजार रुपये स्वीकारण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मात्र, महिन्याची मुदत संपूनही गुंतवणूकदारांना आश्वासनाप्रमाणे दुप्पट रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी मूळ रक्कम परत मिळविण्यासाठी संबंधित महिलेकडे पाठपुरावा सुरू केला. वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचा संशय गुंतवणूकदारांना आला. अखेर त्यांनी पनवेल शहर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी मुंबई पोलीस दलाच्या आर्थिक गुप्तवार्ता कक्षामार्फत प्राथमिक चौकशी करण्यात आली. पोलीस उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या पथकाने केलेल्या चौकशीनंतर संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.