स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
व्यावसायिक व हौशी छायाचित्रकारांना सुवर्णसंधी
विजेत्यांना २० हजारांपर्यंत पारितोषिक
१२ उत्कृष्ट छायाचित्रांना महापालिका दिनदर्शिकेत स्थान
नवी मुंबई : निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, खाड्या, उद्याने, सांस्कृतिक वैभव आणि आधुनिक विकासाचा अनोखा संगम असलेल्या नवी मुंबईची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आता कॅमेऱ्याच्या नजरेतून जगासमोर येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘प्रतिमा नवी मुंबईची – छायाचित्रण स्पर्धा २०२६-२७’ आयोजित करण्यात आली असून, शहरातील व्यावसायिक आणि हौशी छायाचित्रकारांना आपल्या कलागुणांचे दर्शन घडविण्याची संधी मिळणार आहे.
नवी मुंबई शहराचे सौंदर्य, निसर्गसंपदा, ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि विकासाचे विविध पैलू छायाचित्रांच्या माध्यमातून अधोरेखित करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. दिघा ते बेलापूर या संपूर्ण महापालिका क्षेत्रातील छायाचित्रकारांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
स्पर्धेचे आयोजन व्यावसायिक आणि हौशी अशा दोन स्वतंत्र गटांत करण्यात आले आहे. व्यावसायिक गटातील विजेत्याला २० हजार रुपये, तर हौशी गटातील विजेत्याला १२ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय दोन्ही गटांतील विजेत्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे आणखी एक आकर्षण म्हणजे निवडण्यात येणाऱ्या १२ उत्कृष्ट छायाचित्रकारांच्या कलाकृतींना थेट नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत दिनदर्शिकेत स्थान मिळणार आहे. दिनदर्शिकेच्या प्रत्येक महिन्याच्या पानावर निवडक छायाचित्र प्रसिद्ध केले जाणार असल्याने छायाचित्रकारांच्या कलेला व्यापक प्रसिद्धी मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
‘नवी मुंबईची वैशिष्ट्ये’ हा स्पर्धेचा विषय असून, समुद्रकिनारे, खाड्या, निसर्गरम्य परिसर, उद्याने, ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे, स्थापत्यकला, नागरी जीवन, सामाजिक उपक्रम आणि शहराच्या आधुनिक विकासाचे विविध पैलू छायाचित्रांतून टिपता येणार आहेत.
‘तुमच्या नजरेतून नवी मुंबई… तुमच्या छायाचित्रातून नवी मुंबईची ओळख!’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्थानिक छायाचित्रकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच नवी मुंबईची वेगळी ओळख व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.
या स्पर्धेला नवी मुंबईकर छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास महापौर सुजाता सुरज पाटील यांनी व्यक्त केला आहे. स्पर्धेसाठी अर्ज नोंदणी लवकरच सुरू होणार असून, व्यावसायिक व हौशी छायाचित्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती गिरीश कान्हा म्हात्रे आणि उपसभापती राजू मढवी यांनी केले आहे.