नवी मुंबईत ३२वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस; २५० शाळांमधील ५७८ विद्यार्थ्यांचा सहभाग
नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
नवी मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि नवोन्मेषी विचार रुजल्यास राष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता संशोधन, प्रयोग आणि नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा, असे प्रतिपादन श्रमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक यांनी केले.
कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि एफ. जी. नाईक कला, माहिती तंत्रज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, श्रमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने आयोजित ३२वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस २०२६-२७ रविवारी रा. फ. नाईक विद्यालयात उत्साहात संपन्न झाली. या काँग्रेसचे उद्घाटन संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमात ठाणे व नवी मुंबई परिसरातील तब्बल २५० शाळांमधील ५७८ विद्यार्थी आणि २०० शिक्षकांनी सहभाग घेतला. युवा वैज्ञानिकांनी आपले संशोधन प्रकल्प, नाविन्यपूर्ण संकल्पना, संशोधन अहवाल आणि पेटंटसंबंधित संशोधन सादर केले. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे मूल्यमापन ५० तज्ज्ञ परीक्षकांनी केले.
यावेळी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे, श्रमिक शिक्षण मंडळाच्या शिक्षण संचालिका अमिता पंडित भट्ट, उज्ज्वला धोर्टे, विश्वास कोर्डे, संध्या धारडे, एफ. जी. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक, रा. फ. नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील, मुख्याध्यापिका राजश्री यादव, एलेन फर्नांडिस, सुमती सुप्पैया, सीमा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. उमेश पळणीटकर आणि वाहिदा कुरेशी यांनीही आपले विचार मांडले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
मार्गदर्शन करताना संदीप नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचे आणि संशोधनक्षमतेचे कौतुक केले. नवी मुंबईतील युवा वैज्ञानिकांना संशोधनाच्या प्रवासात कोणत्याही अडचणी आल्यास शक्य ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नवी मुंबई विज्ञान केंद्र केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील सर्वोत्तम विज्ञान केंद्रांपैकी एक बनविण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना संशोधनाची प्रेरणा मिळावी, यासाठी नासा आणि इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील वैज्ञानिकांना नवी मुंबई विज्ञान केंद्रात आमंत्रित करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना संशोधनाच्या नव्या संधी आणि दिशा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने नवे शोध आणि ज्ञान विकसित होत आहे. शिक्षकांनीही या बदलत्या ज्ञानविश्वाची विद्यार्थ्यांना ओळख करून द्यावी. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास, प्रयोग करण्यास आणि चिकित्सक दृष्टिकोनातून विचार करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रकल्प विकसित करून संशोधनासह पेटंट मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत. यातून त्यांच्या वैयक्तिक प्रगतीबरोबरच देशाच्या विकासातही मोलाची भर पडेल, असे त्यांनी नमूद केले.
कोरोना महामारीचा संदर्भ देताना पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांच्या समन्वयाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाधारित तयारी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसह समाजाला अशा परिस्थितींसाठी सक्षम बनविण्यात विज्ञान शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.
या विज्ञान काँग्रेसमुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्याची, चिकित्सक विचारशक्ती विकसित करण्याची आणि दैनंदिन जीवनातील समस्यांवर वैज्ञानिक पद्धतीने उपाय शोधण्याची संधी मिळाली. नसीम कुर्णे यांनी आभार प्रदर्शन केले.