पुणे : उरुळी कांचन येथील कुप्रसिध्द गुंड आप्पा उर्फ प्रकाश हरीभाऊ लोंढे (वय-48, रा. उरुळी कांचन ता. हवेली) याचा आज (गुरूवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरानी रिव्हॉल्वर मधून गोळ्या घालून खून केला.
अप्पा लोंढे याच्यावर गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोरानी तिक्ष्ण हत्यार्यांच्या साह्याने अनेक वार केले. ही घटना लोंढे मॉर्निग वॉकसाठी जात असताना घडली. आप्पा लोंढेवर खून, खूनाचे प्रयत्न, जमीन लुबाडणूक या सारखे तब्बल पन्नासहून अधिक गुन्हे दाखल आहेत. दहा वर्षांपूर्वी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आप्पा लोंढे याच्या घरापासून काही अंतरावर चालत जात असताना दबाधरुन बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये गंभीर जखमी झाले. हल्लेखोर फरार झाले. लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक अभिमन्यू पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजितसिंह परदेशी पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घटनास्थळावर गावठी पिस्तुलाची एक पुंगळी सापडली आहे.
घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे घटनास्थळावर बंदोबस्त ठेवण्यात आला. आप्पा लोंढे याची बारामती, हवेली, दौंडसह पुणे जिल्ह्यात दहशत होती. त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे पुणे जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होते, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजितसिंह परदेशी यांनी दिली.