नवी मुंबई : केवळ आज तंबाखूविरोधी दिन आहे, म्हणून तंबाखूविरोधात एक दिवस जनजागृती करून अन्य दिवशी निरूत्साह दाखविणे योग्य नाही. तंबाखू प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सेवनाने होणार्या दुष्परिणामाबाबत प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता वर्षभर तंबाखूविरोधात जनजागृती करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐरोलीतील आमदार संदीप नाईक यांनी केले.
तंबाखूविरोधी दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 येथील शिवाजी चौकात ड्रिम नेहा ट्रस्ट आणि ग्रीन होपच्या संयुक्त माध्यमातून रविवारी सकाळी आयोजित कार्यक्रमात आमदार संदीप नाईक बोलत होते. यावेळी तंबाखूसेवनाने होणारे आजार आणि शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबतच्या पत्रकाचे आमदार संदीप नाईकांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हे पत्रक नवी मुंबईत ठिकठिकाणी वर्दळीच्या ठिकाणी वितरीत करणार असल्याची माहिती ड्रीम नेहा ट्रस्टचे खजिनदार संदेशदादा डोंगरे यांनी दिली.
तंबाखूबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार संदीप नाईक पुढे म्हणाले की, कष्टकरी व श्रमिक वर्ग दिवसभर काबाडकष्ट केल्यावर श्रमपरिहाराकरता तंबाखूचे सेवन करत असला तरी तो स्वत:ला नकळत मृत्यूकडेच घेवून जात आहे. रिक्षा चालक, टॅक्सीचालक, टेम्पोचालक, माथाडी वर्ग, युवा वर्ग व ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर वर्ग मोठ्या प्रमाणावर आज तंबाखूच्या आहारी गेलेला आहे. ज्येष्ठ नागरिक, प्रौढ वर्गदेखील अधिकांश प्रमाणावर तंबाखूच्या विळख्यात अडकलेला आहे. या सर्व घटकांची तंबाखूच्या व्यसनातून मुक्त करण्याचे अग्निदिव्य आपणास उचलावे लागणार आहे. त्यासाठी व्यापक प्रमाणावर लोकप्रबोधनाची चळवळ उभारण्याची गरज आहे. तंबाखूमुळे मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या आणि शरीराला जडणारे आजार याबाबतची माहिती तंबाखूचे सेवन करणार्यांना व त्यांच्या परिवारालाही मार्गदर्शन करणे आज काळाची गरज असल्याचे प्रबोधन आमदार संदीप नाईक यांनी यावेळी केले.
पावसाळ्याच्या कालावधीत ग्रीन होप संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण व पर्यावरणविषयक अन्य कार्यक्रम आयोजनाचीही माहिती यावेळी आमदार संदीप नाईकांनी संबंधितांना दिली.़
तंबाखूविरोधात जनजागृती व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजणार्या ड्रीम नेहा ट्रस्टच्या पदाधिकार्यांची स्तुती करून हा कार्यक्रम नवी मुंबईपुरताच सिमित न ठेवता राज्याच्या कानाकोपर्यात सामाजिक संस्थांनी याबाबत व्यापक लोकचळवळ उभारावी. एक आमदार म्हणून नाही तर त्या चळवळीचा एक सदस्य या नात्याने मी तुमच्यासोबत सतत राहीन. तंबाखू व अंमली पदार्थांच्या विरोधात विधानभवनात सातत्याने आवाज उठविला आहे आणि यापुढेही उठविणार असल्याचे आमदार संदीप नाईक यांनी सांगितले. या कार्यक्रमास आमदार संदीप नाईक यांच्यासमवेत नवी मुंबई देशस्थ आगरी-कोळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप खांडगेपाटील, सचिव सुजित शिंदे आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ड्रीम नेहा ट्रस्टचे अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, सचिव विकास बोंबे, खजिनदार संदेश डोंगरे, अंकुर सोनावणे, अक्षय पाटील,अनिकेत पालकर, अर्जुन देवेंद्र, रितेश चवरकर, जयदीप तांडेल, रोहन पगारे आदींनी परिश्रम घेतले.