मुंबई : मुंबई क्रिकेट असोशिएशनने रविवारी झालेल्या बैठकीत शाहरुख खानच्या वानखेडे स्टेडियम प्रवेशावर घातेलली बंदी उठवली असली तरी, अंकित चव्हाणवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अंकितवर बीसीसीआयने घातलेल्या बंदीला आव्हान न देण्याचा निर्णय एमसीएच्या बैठकीत घेण्यात आला. मागच्याच आठवडयात आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्ली सत्र न्यायालयाने अंकित चव्हाण, श्रीशांत आणि अजित चंडिला या तिघांची निर्दोष मुक्ततता केली होती.
दिल्ली पोलिसांना तिघांविरोधात कोणतेही सबळ पुरावे सादर करता आले नव्हते. अंकित मुळचा मुंबईचा असून, तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळायचा. आयपीएलच्या सहाव्या पर्वात 2013 मध्ये अंकित, श्रीशांत आणि अजित चंडिलावर स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर बीसीसीआयने तिघांवरही आजीवन बंदीची कारवाई केली.
दिल्ली सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी तिघांची निर्दोष मुकत्ता केल्यानंतर बीसीसीआयने त्यांच्यावरील बंदी मागे घ्यावी अशी मागणी होत आहे. मात्र बीसीसीआयने तिघांवरील बंदी कायम ठेवली आहे. याच निर्णयाला एमसीएने आव्हान न देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अंकितसाठी देशांतर्गत क्रिकेटचे दरवाजे बंद रहाणार आहेत.