सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
वाशी : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत नेरुळ पोलीस ठाण्याच्या अधिकारी/कर्मचारी समुहाने अत्यंत धाडसाने उत्तर प्रदेशातील आग्रा येथे कश्मिरी बाजार परिसरात धडक मोहिम हाती घेऊन अपहरण केलेल्या २१ मुलींची सुटका केली. या धाडसी मोहिमेबद्दल नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते बुधारी महापौर दालनात नेरुळच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीम. संगीता शिंदे अल्फान्सो यांच्यासह त्यांच्या सहकार्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समितीच्या सभापती सौ. नेत्रा शिर्के, सभागृह नेते जयवंत सुतार, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी श्रीम. संगीता शिंदे अल्फान्सो यांनी हा सत्कार आमच्या दृष्टीने अविस्मरणीय असून पोलीस दलाचा आत्मविश्वास वाढविणारा आहे असे सांगितले. ही मोहिम सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांमुळे यशस्वी झाली असे सांगत त्यांनी या मोहिमेसाठी परवानगी दिल्याबद्दल पोलीस आयुक्त प्रभात रंजन, परिमंडळ १ चे पोलीस उप आयुक्त शहाजी उमप यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले याचा आवर्जुन उल्लेख केला. उत्तर प्रदेशातील पोलीस दलानेही उत्तम सहकार्य केल्याचे नमुद करीत त्यांनी या कामगिरीबद्दल शहराच्या प्रथम नागरिकाने केलेल्या या सत्कारामुळे समाजात चांगला संदेश प्रसारीत होईल व पोलीस दलाचे मनोबल वाढेल असे त्या म्हणाल्या.
प्रत्यक्ष मोहिमेत सहभागी असणारे पोलीस निरीक्षक नागनथ मजगे यांनी नेरुळ येथील आठ वर्षांपूर्वी पळवून नेऊन आग्रा येथे अनैतिक व्यवसायात ढकलली गेलेली मुलगी व तिची करुण कहाणी ऐकून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीम. संगीत अल्फान्सो यांनी पुढाकार घेऊन हाती घेतलेले आग्र्याहून सुटका मिशन संगतवार कथन केले. शोध घेण्याची कार्यपध्दती, त्याठिकाणी आलेल्या अडचणी, त्यामधून प्रसंगावधान राखून काढलेले मार्ग याची सविस्तर माहिती देत हे मिशन उत्तम टिमवर्क मुळेच यशस्वी झाले हे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.
महापौर सुधाकर सोनवणे यांनी ही मोहिम म्हणजे पोलीसांमधील सामाजिक बांधिलकीच्या भावनेचे उत्तम उदाहरण आहे असे सांगत नवी मुंबई पोलीसांचा सर्व जनतेला अभिमान आहे असे गौरवोद्गार काढले. महापौरांच्या शुभहस्ते नेरुळच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीम. संगीता शिंदे अल्फान्सो यांच्यासह त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक नागनाथ मजगे, सहाय्यक निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, सचिन हिरे, दिपक डोंब, उपनिरीक्षक साहेबराव भोसले, पोलीस शिपाई भाऊसाहेब लोंढे, श्रीकांत उबाळे, ए.आर.साळुंके, मंगेश पाटील, राजू भांगरे, सुवर्णा कांदळकर, अर्चना पाटील आणि सोनाली गोडसे यांचा सन्मान करण्यात आला.