* नेरूळ पोलीसांची कामगिरी * आणखी लुटले गेले असण्याची शक्यता!
नवी मुंबई : २१ दिवसामध्ये मधुमेह (डायबेटीसचा) आजार बरा करुन देण्याचे आश्वासन देऊन नेरुळ मधील एका दाम्पत्याकडून तब्बल ८ लाख ७५ हजार रुपये उकळणार्या वेदुबाबाला नेरुळ पोलिसांनी सापळा लावून अटक करण्याची कारवाई केली आहे. वेदा कमलसिंग नाडी राह असे या वेदुबाबाचे नाव असून त्याने अशाच पद्धतीने अनेक व्यक्तींना फसविले असण्याची शक्यता असून त्यानुसार त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती नेरुळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता शिंदे यांनी दिली.
नेरुळमध्ये राहणारे कुसुमोदर शेट्टी यांना डायबेटीसचा आजार असल्याने त्यावर त्यांनी बरेच उपचार केले. परंतु, त्यांचा त्रास कमी होत नव्हता. त्यामुळे त्यांचे मित्र विश्वनाथ शेट्टी यांनी डायबेटीसवर आयुर्वेदीक उपचार करणार्या वेदा कमलसिंग नाडी राह या वेदुबाबाचे नाव सुचवून त्याचा मोबाईल नंबर मिळवून दिला. त्यानुसार शेट्टी यांनी २०१३ मध्ये वेदुबाबा याला आपल्या घरी बोलावून घेतले. त्यावेळी वेदा कमलसिंग याने डायबेटीसचा आजार २१ दिवसामध्ये बरा करून देण्याचे आश्वासन देऊन त्यासाठी ९ लाख रुपये लागतील असे सांगितले होते. त्यावेळी वेदुबाबा वेदा कमलसिंग याने शेट्टी यांच्या पत्नीच्या गुडघ्याचा आजार देखील पूर्णपणे बरा करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यावेळी वेदुबाबा वेदाच्या बोलण्याच्या शैलीवर भुलून शेट्टी यांनी डायबेटीसच्या उपचारासाठी ठरलेल्या रक्कमेपैकी टप्प्या-टप्प्याने तब्बल पावणे नऊ लाख रुपयांची रक्कम वेदुबाबाला दिले. त्यानंतर वेदुबाबाने आयुर्वेदीक औषध असल्याचे सांगून शेट्टी यांना एक महिने सदर औषध इंजेक्शनद्वारे घेण्यास सांगितले. तथापि औषधाची खात्री करण्यासाठी शेट्टी यांनी सदर औषधांची मुंबईतील चरक टेस्टींग लेबोरेटरीमधून तपासणी करुन घेतली. या तपासणीत सदर औषधांमध्ये शरीराला घातक असलेले लिड, मर्क्युरी, आर्सेनिक, कॅडमिअम आदिंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आले. त्यामुळे शेट्टी यांनी वेदुबाबा वेदा याच्याकडे आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याने आपला मोबाईल फोन बंद केल्यानंतर शेट्टी यांनी त्याच्याविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याचदरम्यान वेदुबाबा वेदा याने आपला मोबाईल फोन चालू केल्याची माहिती शेट्टी यांनी नेरुळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता शिंदे यांनी वेदुबाबा वेदा कमलसिंग याच्याकडे बोगस गिर्हाईक पाठवून सापळा लावला. त्यानंतर त्याला त्याच्या फॉर्चुनर कारसह ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी करुन त्याला अटक केली. या वेदुबाबाने अशाच पद्धतीने किती लोकांची फसवणूक केली, याबाबत तपास करण्यात येत असल्याचे संगिता शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी अशा वेदुबाबांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन नेरुळ पोलिसांकडून करण्यात आले आहे.