** सारसोळे मच्छिमार ग्रामस्थांसाठी नामदेव भगतांचा पुढाकार **
नवी मुंबई : सारसोळे जेटीवर १४ जाळी जाळणारे गुन्हेगारांचा आजही शोध लागलेला नाही. त्यामुळे मासेमारीसाठी रात्री-अपरात्री ये-जा करताना सारसोळेच्या आगरी-कोळी समुदायाला दहशतीखाली वावरावे लागत आहे. या घटनेतून खाडीची सुरक्षा व्यवस्थाही ठिसूळ असल्याचे निष्पन्न झाले असल्याने सारसोळेच्या जेटीवर जाळी जाळणार्या फरार गुन्हेगारांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पामबीच मार्गावर सारसोळेची जेटी असून सारसोळेचे ग्रामस्थ मासेमारीकरता याच जेटीवरून ये-जा करत असतात. सारसोळेच्या ग्रामस्थांची उपजिविका खाडीतील मासेमारीवरच अवलंबून आहे. २३ डिसेंबर २०१२ रोजी पहाटे १.३० ते २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात समाजकंठकांनी अंधाराचा फायदा घेत सारसोळेच्या ग्रामस्थांची जेटीवर असलेली १४ जाळी जाळली. २६/११च्या मुंबई हल्ल्याच्या घटनेनंतर सागरी सुरक्षेचे महत्व अधोरेखित झाले आहे. दुर्दैवाने नवी मुंबईतील खाडीकिनारे व खाडीअर्ंतगतचा भाग आजही असुरक्षित असल्याचे विविध घटनांवरून पहावयास मिळत असल्याचे नामदेव भगत यांनी निवेदनात नमूद केले आहे.
जेटीवरील १४ जाळी जाळल्याने सारसोळेच्या ग्रामस्थांचे अंदाजे ४ लाख ९० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. जाळी जळाल्याने व जाळी जाळणारे गुन्हेगार अद्यापि फरार असल्याने सारसोळेचे ग्रामस्थ भरती-ओहोटीचे गणित सांभाळताना रात्री-अपरात्री एका अनामिक भीतीखाली वावरत आहेत. अंधाराचा फायदा उचलत आजही सारसोळेच्या जेटीवर अज्ञात घटकांचा वावर असल्याचा सारसोळेच्या ग्रामस्थांचा संशय आहे. समस्येचे गांभीर्य आणि सागरी सुरक्षेचे महत्व लक्षात घेता स्थानिक नेरूळ पोलीसांना सारसोळेच्या जेटीवर रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याचे तसेच जाळी जाळणार्या फरार गुन्हेगारांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी नामदेव भगत यांनी केली आहे.