नवी मुंबईच्या राजकारणात नेरूळ सेक्टर 16-18 हा परिसर गेल्या काही वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. 2005 आणि 2010च्या महापालिका निवडणूकीत या परिसरातून दोन्ही वेळेला शिवसेनेचाच उमेदवार विजयी झाला होता. त्यात हा परिसर शिवसेनेचे शहरप्रमुख विजय मानेंचा निवासी परिसर. महापालिका निवडणूकीपूर्वी या परिसरातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल असे कोणी राजकीय भाकीत वर्तविले असते तर स्थानिकांनीदेखील त्यांचे भाकीत गांभीर्याने घेतले नसते. पण हा चमत्कार घडला. या चमत्काराचे खरे श्रेय जाते ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेश भगत यांनाच! 2010च्या महापालिका निवडणूकीत शे-सव्वाशे मतांनी निसटता पराभव झाल्यावर या ठिकाणी गणेश भगत यांनी गेली पाच वर्षे तळ ठोकला होता. घरटी जनसंपर्क आणि संपर्कात आलेल्यांची जनसेवा हा तंत्रमंत्र गणेश भगतांनी नसानसात बिंबविला. गणेशदादांच्या जोडीला मास्टर माईंड रविंद्र भगत आणि अँग्री यंग मॅन किसमत भगत हे बंधू होतेच. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेश, किसमत, रविंद्र या त्रिमूर्तीने नेरूळच्या राजकारणात चमत्कार घडवून आणला. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेना शहरप्रमुखांच्या भावजयीला तब्बल 1000 मतांच्या फरकाने दणदणीत पराभूत करत या ठिकाणावर राष्ट्रवादी काँग्र्रेसचा विजयी झेंडा फडकविला.
नेरूळमध्ये काही प्रभागांमध्ये महापालिका निवडणूकीचे निकाल धक्कादायक लागले. त्यात प्रभाग 96चा आवर्जून समावेश हा करावाच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. रूपाली किसमत भगत या प्रभागातून शिवसेना शहरप्रमुख विजय मानेंच्या भावजयीला पराभूत करून विजयी झाल्या. प्रभाग 96 मध्ये नेरूळ सेक्टर 16-18चा समावेश होतो. हा परिसर गेल्या एक दशकापासून नवी मुंबईच्या राजकारणात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून गणला जायचा. पण याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल 1000हून अधिक मतांनी आघाडी घेत मुसंडी मारली. महापालिका निवडणूकीत अनेक परिसरात प्रस्थापितांचा पराभव करत अनेक जण जायंट किलर ठरले आहे. नेरूळ पश्चिम परिसराचा राजकीय तुलनात्मक विचार केल्यास सौ. रूपाली किसमत भगत यांचाही आजमितीला या जायंट किलरच्या मांदीयाळीत अग्रक्रमाने समावेश करावा लागेल. अर्थात या परिवर्तनाचे खर्या अर्थांने शिल्पकार एकाच व्यक्तिला मानावे लागेल ते म्हणजे फक्त आणि फक्त गणेशदादा भगत यांनाच!
राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षसंघटनात्मक विचार केल्यास पूर्वी गणेशदादा भगत हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बेलापुर विधानसभा प्रमुख म्हणून कार्यरत होते. नुकत्याच झालेल्या पक्षसंघटनात्मक बदलामध्ये गणेशदादा भगत यांची नेरूळ पश्चिमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून पक्षाने नियुक्ती केली आहे. 2000 साली झालेल्या महापालिका निवडणूकीत शिवसेना उमेदवार सतीश रामाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेशदादा भगत यांना पराभूत केले. हा पराभव जेमतेम 125च्या आसपास मतांनी झालेला असला तरी या निवडणूकीत गाववाला-कॉलनीवाला हा प्रातींय प्रचार निर्नायक ठरला. या प्रचारामुळेच गणेशदादा भगतांना पराभवाला सामोरे जावे लागले. अर्थांत 2015च्या महापालिका निवडणूकीत गणेशदादा भगतांनी आपल्या पराभवाचे उट्टे सव्याज फेडत दणदणीत 1000 पेक्षाही अधिक मतांची आघाडी गाववाला-कॉलनीवाला या अपप्रचाराला कृतीतून उत्तर दिले.
2010 साली झालेल्या पराभवानंतर तब्बल 5 वर्षे गणेशदादा भगतांनी नेरूळ सेक्टर 16,18,24 या परिसरात तळ ठोकला. सामाजिक कार्य आणि घरटी जनसंपर्क वाढविला.2015 च्या महापालिका निवडणूकीत प्रभाग पुर्नरचनेत नेरूळ सेक्टर 16,18,24 परिसरात दोन प्रभाग निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने गणेशदादा भगत यांच्यावर प्रभाग 96ची जबाबदारी सोपवित त्यांच्याच भावजयीला म्हणजेच सौ. रूपाली किसमत भगत यांना निवडणूक रिंगणात उतरविले.
भगत त्रिमूर्तीमध्ये गणेश भगत आणि किमसत भगत ही जोडी रागीट, तापट आणि प्रेमळ असली तरी रविंद्र भगत हे खर्या अर्थांने मास्टर माईंड रसायन आहे. थंड डोक्याचा, चाणाक्ष नजरेचा, धुर्त रविंद्र भगत हा खर्या अर्थांने या त्रिमूर्तीच्या जोडीचा पडद्यामागील ब्रेन मानावा लागेल.
पालिका निवडणूकीत प्रभाग 96मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला विजय आणि शिवसेनेच्या नेरूळ पश्चिमेकडील या बालेकिल्ल्याला पडलेले खिंडार हे खर्या अर्थांने फक्त आणि फक्त गणेशदादा भगत यांच्याच परिश्रमाची पोचपावती आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही.
शिवसेनेच्या बालेकिल्याला तब्बल 1000 पेक्षाही अधिक मतांनी दणदणीय विजय संपादन करूनही या भगत त्रिमूर्तीचे पाय आजही जमिनीवर आहे. नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत या पूर्णपणे गणेशदादा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत आहे. प्रसिध्दीच्या झोतात राहून चमकेशगिरी करण्यापेक्षा जनसामान्यांची कामे करून जनाधार आपणाकडे वळविण्याचा एककलमी कार्यक्रम या भगत त्रिमूर्तीने निवडणूकीनंतर राबविण्यास सुरूवात केली आहे.
सौ. रूपाली किसमत भगत या भगत त्रिमूर्तीसोबत स्थानिक रहीवाशांच्या घरटी जनसंपर्कात आजमितीला व्यस्त असून नागरी समस्या निवारणाला प्राधान्य देत आहेत. धुरीकरण, मूषक नियत्रंण, साथीचे आजार यासह स्थानिकांच्या अन्य समस्या निवारणावर नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत भर देत आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगत त्रिमूर्तीने मारलेली मुसंडी, जनसंपर्कातील मोर्चेबांधणी, जनसेवेतील आक्रमकता पाहता भगत त्रिमूर्तीला आवरणे शिवसेनेकरता नजीकच्या काळात अशक्यप्राय बाब होवून बसणार आहे.
——-