संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कांदा बटाटा मार्केटमध्ये वर्षभरापूर्वी गळफास घेवून आत्महत्या केलेल्या व्यापार्यांकडील थकीत रक्कम मिळवून देण्याची कामगिरी कांदा बटाटा मार्केटचे संचालक अशोक वाळूंज यांनी केली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासातील हे पहिलेच उदाहरण असून संचालक अशोक वाळूंज यांच्या अथक प्रयासामुळे आंबेगाव तालुक्यातील संबंधित १२ शेतकर्यांच्या चेहर्यांवर हास्य उमलले असून सोमवारी त्यांना बाजार समिती मुख्यालयात त्यांच्या रकमेचे वितरणही करण्यात आले.
अशोक वाळूंज आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कांदा बटाटा मार्केट हे राज्याच्या सहकार क्षेत्रात एक समीकरण गेल्या दशकभराच्या कालावधीत परिचित झालेले आहे. कांदा बटाटा मार्केटमधील आडते, खरेदीदार, वाहतुकदार, माथाडी, मापाडी, मेहता, पालावाल व अन्य घटकांच्या समस्यांना सातत्याने अशोक वाळूंज यांनी न्याय देत आपल्या परिश्रमातून त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे कांदा बटाटा मार्केट हे अशोक वाळूंज यांचा बालेकिल्लाच बनला आहे. या मार्केटमध्ये संचालकपदाच्या निवडणूका कधीही झाल्या तरी अशोक वाळूंज यांचा पाडाव करणे अशक्य असल्याचे त्यांच्या विरोधकांकडून उघडपणे बोलले जाते. ही किमया अशोक वाळूंज यांच्या कामाची व परिश्रमाची आहे. परंतु अन्य संचालकांप्रमाणे आडते व खरेदीदार यांच्या हिताची जोपासना न करता त्यांनी शेतकरी वर्गाचेही हित सदोदित जोपासण्याचा प्रयास केला आहे. सोमवारी आंबेगाव तालुक्यातील शेतकर्यांच्या चेहर्यावर फुललेले हास्य ही अशोक वाळूंज यांच्या कामाचीच पोचपावती मानावी लागेल.
वर्षभरापूर्वी कांदा बटाटा मार्केटमध्ये व्यापारात आर्थिक नुकसान झाल्याने शनैश्वर ट्रेडींग कंपनीचे मालक राधेशाम मोरया (वय अंदाजे ४८) यांनी बाजार आवारातील एका गाळ्यामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. राधेशाम मोरया हे बाजार आवारात बिगर गाळाधारक व्यापारी म्हणून व्यवसाय करत असून त्यांच्या अचानक आत्महत्येने शेतकर्यांकडील २५ लाख रूपये थकीत रकमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे बाजार आवारातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या थकबाकीमध्ये आंबेगाव तालुक्यांमधील १२ शेतकर्यांच्या बटाटा विक्रीच्याही पैशाचाही समावेश होता. माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या मातीला व आपल्या माणसांना विसरत नाही. आंबेगावच्या संबंधित शेतकर्यांनी थकीत रकमेबाबत संचालक अशोक वाळूंज यांना गळ घालून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली.ढ़
राधेशाम मोरया यांनी आत्महत्या केली असली तरी त्यांचा परवाना (व्यवसायाचे लायसन्स) जामिनदार ५ लाख रूपयांचा असल्याचे संचालक अशोक वाळूंज यांनी शोधून काढले. त्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे पाठपुरावा संबंधित १२ शेतकर्यांना न्याय मिळवून दिला. जामिनदारांकडून पैसे वसूल करून सोमवारी सकाळी बाजार समिती मुख्यालयात संचालक अशोक वाळूंज यांनी बाजार समिती सचिव शिवाजी पहिनकर यांच्या उपस्थितीत संबंधित १२ शेतकर्यांना ४ लाख ६८ हजार रूपये रक्कम वितरीत केली. मृत व्यापार्यांकडून शेतकर्यांची थकीत रक्कम संचालक अशोक वाळूंज यांनी वसूल केल्याने राज्याच्या सहकारक्षेत्रात दिवसभर संचालक अशोक वाळूंज यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे.