नवी मुंबई : महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने क्रीडा प्रशिक्षण केंद्रातून विविध खेळांचे तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येत असून क्रिकेट, थलेटिक्स, तायक्वांदो प्रमाणेच कबड्डी खेळाडूंनीही आपल्या गुणवत्तेचे प्रदर्शन करीत आपले कौशल्य प्रकट केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 72, कोपरखैरणे शाळेच्या 14 वर्षाआतील मुलांच्या कबड्डी संघाने 10 ऑक्टोबर रोजी अलिबाग येथे झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत अंतिम विजेतेपद पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेत मुसंडी मारली आहे. या कबड्डी संघाला नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा विभागामार्फत राबविल्या जाणार्या क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले होते. आजपर्यंत नवी मुंबईमधून कबड्डी खेळात कोणत्याही शाळेचा संघ राज्यस्तरापर्यंत पोहचलेला नसून महानगरपालिका शाळेच्या या कबड्डी संघाने हा बहुमान पटकाविला आहे.
यापुर्वी महानगरपालिका शाळेतील कु. लहू चव्हाण हा कबड्डी खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळला असून कु. सुनिल चव्हाण हा कबड्डीपट्टू राज्य निवड चाचणीसाठी पात्र ठरला होता. हे दोन्ही खेळाडू महानगरपालिकेच्या क्रीडा प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले असून आता शाळा क्र. 72, कोपऱखैरणे शाळेच्या 14 वर्षाखालील कबड्डी संघाने राज्यस्तरावर पोहचलेला नवी मुंबईतील पहिला शालेय कबड्डी संघ ठरण्याचा बहुमान मिळविलेला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृह नेते जयवंत सुतार, विरोधीपक्ष नेते विजय चौगुले, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती प्रकाश मोरे आणि सर्व पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी व कर्मचारीवृंद यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. यापुढील काळात क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विविध खेळांतील अधिकाधिक गुणवंत क्रीडापट्टू घडविण्याचा ध्यास घेऊन क्रीडा विभाग कार्यरत आहे.