कल्याण : प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीची भाजपाची उमेदवारी ठरविण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे होते. त्यांनी उमेदवार निवडीसाठी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वेक्षण केले आणि उमेदवार निश्चिती केली. या निवडणूक निर्णय प्रक्रियेच्या मध्यातून भाजपाच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. यामुळे बंडखोरी करणार्या कार्यकर्त्यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांची समजूत काढण्यात येईल असे महत्वपूर्ण विधान भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना केले.
भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांना या महापालिका निवडणुकीत जास्तीत संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचप्रमाणे भाजपा 122 जागांवर निवडणुका लढवीत आहे, मात्र इच्छुकांची संख्या तब्बल 650 होती. सहाजिकच सगळ्यांच इच्छुकांना न्याय देणे शक्य नव्हते. नाराज असेल्या या कार्यकर्त्यांना भाजपा वार्यावर सोडणार नाही. त्यामुळे त्यांनी पक्षाच्या विजयासाठी काम करावे. अपक्ष म्हणून बंडखोरी करणार्या उमेदवारांनी याचा सांगोपांग विचार करावा. यामध्ये निवडणूक प्रमुख खासदार कपिल पाटील आणि माझ्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहे असे आमदार नरेंद्र पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.