मुंबई : भारतीय हवाई दलाच्या एमआय- 17 या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात हे हेलिकॉप्टर तात्काळ उतरवण्यात आले. या हेलिकॉप्टरमध्ये असणारे सहाजण सुखरूप आहेत. ही घटना दुपारी अडीजच्या सुमारास घडली.
हवाई दलाचे एमआय-17 हे हेलिकॉप्टर निघाले असतांना वैमानिकाला या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आले. त्यांनी हे विमान तात्काळ खाली उतरवण्यासाठी विनंती केली, अशी माहिती बांद्रा कुर्ला संकुल पोलीस ठाण्याचे अधिकारी कुंडलिक निगडे यांनी दिली.
हे हेलिकॉप्टर बीकेसी मैदानात उतरवण्याचा निर्णय झाल्यानंतर बीकेसी पोलिसांनी तात्काळ मैदानात धाव घेत हे मैदान खाली केले. या हेलिकॉप्टरच्या वैमानिकाने कोणत्याही इमारतीचे नुकसान न करता सावधतेने हेलिकॉप्टर मैदानाच्या मध्यभागी उतरवले.
बीकेसी मैदानात रिक्षाचालक, नागरिकांची सतत वर्दळ असते. सुदैवाने हे मैदान बुधवारी बर्यापैकी खाली असल्याने हेलिकॉप्टर उतरवणे शक्य झाल्याचे पोलीस अधिकार्याने सांगितले.