मोहाली : पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणार्या खेळपट्टीमुळे मोहालीमधील पहिली क्रिकेट कसोटीचा तिसर्याच दिवशी निकाल लागला. फिरकीचे वर्चस्व राहिलेल्या या कसोटीमध्ये भारताने १०८ धावांनी विजय मिळविला. भारतीय संघाचा दुसरा डाव २०० धावांत आटोपल्यानंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १०९ धावांमध्येच आटोपला. भारताकडून रवींद्र जडेजाने पाच बळी मिळविले.
या सामन्यातील पहिल्या दोन्ही दिवशी फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले होते. तिसर्या दिवशीही हीच परिस्थिती कायम राहिली. दुसर्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा भारताने दोन गडी गमावून १२५ धावा केल्या होत्या. मात्र सकाळच्या सत्रामध्ये भारताने ८५ धावांमध्ये उर्वरित आठ गडी गमावले. पहिल्या डावात भारताने २०१ धावा केल्या होत्या, तर दुसरा डाव २०० धावांमध्ये संपुष्टात आला. पहिल्या डावातील १७ धावांच्या आघाडीमुळे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २१८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेत कर्णधार विराट कोहलीने पहिल्या षटकापासून फिरकी गोलंदाजांद्वारे आक्रमण सुरू केले. कोहलीने आक्रमक क्षेत्ररक्षण लावले होते. दुसर्याच षटकात रवींद्र जडेजाने व्हरनॉन फिलँडरला बाद केले. त्याच्या पुढच्याच षटकात फाफ डू प्लेसिसही बाद झाला. दक्षिण आफ्रिकेचा सर्वांत तंत्रशुद्ध फलंदाज हाशिम आमला शून्यावरच बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या एबी डिव्हिलर्सने आक्रमक धोरण स्वीकारत क्षेत्ररक्षक पांगविण्याचा प्रयत्न केला; पण अमित मिश्राच्या एका अप्रतिम चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेच्या सर्व आशाही संपुष्टात आल्या. स्टिऍन व्हॅन झिलने ३६ धावा करत संघाचा पराभव काही काळ लांबविण्याचा प्रयत्न केला.
भारताकडून जडेजाने पाच, तर आश्विनने तीन गडी बाद केले. अमित मिश्रा आणि वरुण ऍरॉन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.