** १६४०० रुपयांची वेतनवाढ थकबाकीपोटी मिळणार १,१०,१०० रुपये **
नवी मुंबई : एमआयडीसी कोपरखैरणे नाका येथील अक्झोनोबेल इंडिया लिमिटेड या कारखाण्यात लोकनेते गणेश नाईक प्रणित श्रमिक सेना गेल्या १२ वर्षापासून कामगारांचे नेतृत्व करीत असून या संघटनेने आतापर्यंत या कारखान्याशी संघटनेच्या वतीने कामगारांसाठी वेतन वाढीचे तीन करार केले आहेत. संघटनेच्या वतीने कामगारांच्या वेतनवाढीचे मागणीपत्र ५ ऑगस्ट २०१५ रोजी कंपनीला पाठविण्यात आले होते. संघटनेचे अध्यक्ष डॉ संजीव गणेश नाईक यांना कामगारांच्या समस्यांची जाणीव असून त्यांनी हा करार घडवून आणण्यास वेळोवेळी संघटनेला मोलाचे मार्गदर्शन केले. संघटनेचे सरचिटणीस अशोक पोहेकर यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनाशी वेळोवेळी बैठका घेवून अखेर शनिवारी प्रत्येक कामगारास १६,४०० रुपयांची वेतनवाढ देणारा ऐतिहसिक करार घडवून आणला.
आज झालेल्या ४ वर्षाच्या कराराच्या माध्यमातून कारखान्याच्या वतीने कामगारांना प्रत्यक्षपणे १६,४०० रुपये पगारवाढ पुढील ४ वर्षाकरिता मिळणार आहे. हा करार दि. १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधी करिता झालेला आहे. करार २२ महिने उशिरा झाला असला तरी कामगारांना भरघोस वेतनवाढीने मोठा दिलासा मिळाला आहे. या वेतन वाढीबरोबर या करारात कामगारांसाठी २.५० लाखांचा आरोग्य विमा देखील दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक कामगारास दरमहा ९००० रुपये इन्सेन्टीव्ह मिळणार आहे. प्रत्येक कामगारास दरमहा एकूण १३१०० इतकी भरघोस पगारवाढ श्रमिक सेना युनियनच्या माध्यमातून व कारखान्याच्यावतीने करण्यात आली आहे.
या पगारवाढीच्या करारावर कारखान्याच्या वतीने वर्कस मॅॅनेजर अजित कुमार, एच.आर. मॅॅनेजर दिपक पवार, प्रोडक्शन मॅनेजर अभिजित पाटील यांनी आणि संघटनेच्या वतीने श्रमिक सेनेचे अध्यक्ष डॉ संजीव गणेश नाईक, सरचिटणीस अशोक पोहेकर, चिटणीस चरण जाधव व कामगार प्रतिनिधी प्रभाकर बडवे, सुनील राउत, संतोष सावंत, सचिन पाटील, राहुल कांबळे, राकेश राजीवडे यांनी सह्या केल्या.
*** श्रमिक सेना ही कामगारांच्या विश्वासाची संघटना आहे. व्यवस्थापन आणि कामगार हे कारखान्याचे दोन महत्वाचे पैलू असतात. ही दोन्ही चाके व्यवस्थित चालली की कारखान्याची प्रगती होते. कारखान्याने जो विश्वास संघटनेवर दाखवला त्यामुळे कामगारांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. आज हा करार नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर औद्यागिक क्षेत्रातील सर्वात मोठा करार असून याला आपण ऐतिहसिक करार म्हणू शकतो.
– डॉ. संजीव गणेश नाईक
(अध्यक्ष श्रमिक सेना)
*** कामगारांची दिवाळी गोड…
कामगारांना सन २०१४ या वर्षाची थकबाकीची ६५,०००रुपये रक्कम आणि जानेवारी २०१५ ते नोव्हेंबर २०१५ या ११ महिन्यांची ४५,१०० रुपयांची थकबाकी अशी एकूण १,१०,१०० रुपयांची रक्कम कामगारांना थकबाकीपोटी ऐन दिवाळी पूर्वी मिळणार असल्याने सर्व कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. कामगारांनी या करारावर शिक्कामोर्तब होताच संघटनेला धन्यवाद देत कारखान्याच्या प्रवेशद्वारावर फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला.