मुंबई : बिहार निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्याने राज्यातील राजकारणावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. कल्याण-डोंबिवली निवडणूक निकालानंतर शांत असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा बिहारच्या निकालावरून भाजपाला डिवचले आहे.
राज्यात आतच्या घडीला निवडणूक झाली तर भाजपाची अवस्था बिहारसारखी होईल, असा जोरदार टोला शिवसेनेने भाजपाला लगावला आहे. तर दुसरीकडे बिहार निकालाने राज्यातील कॉंग्रेसला नवी ऊर्जा मिळणार आहे.
लोकसभा आणि त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपाचा वारू चौखुर उधळला होता. या यशामुळे भाजपा विरोधकांना तर सोडाच आपल्या मित्रपक्षालाही गणतीत धरत नव्हते.
भाजपाच्या या कृतीमुळे सर्वात जास्त दुखावला गेला होता तो त्यांचा मित्रपक्ष शिवसेना. त्यामुळेच बिहारच्या निवडणुकीत भाजपाच्या झालेल्या पराभवामुळे शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. शिवसेना सत्तेत सहभागी असूनही त्यांना भाजपाकडून सन्माजनक वागणूक मिळत नसल्याने शिवसेना सुरुवातीपासूनच नाराज आहे. या नाराजीतूनच संधी मिळेल तिथे शिवसेना भाजपावर टीका करत असते. आता बिहारच्या निकालानंतर तर शिवसेनेने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली आहे.
बिहार निकालावरून शिवसेना-भाजपामध्ये पुन्हा शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. कारण शिवसेनेच्या या टीकेला भाजपानेही तितकेच तिरसक उत्तर दिले आहे.
एकीकडे भाजपाच्या पराभवाचा आनंद जसा शिवसेनेला झाला आहे, तसा कॉंग्रेसलाही म्हणूनच बिहारमधील निकाल कॉंग्रेसने राज्यात जल्लोष करून साजरा केला.
बिहारमध्ये भाजपच्या पराभवानंतर पाकिस्तानात फटाके फुटणार की नाही हे स्पष्ट नसले तरी नागपुरात रेशिमबाग़च्या संघ कार्यालया समोर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करत भाजप च्या पराभवाचा जल्लोष केला आहे.
बिहारमध्ये भाजप पराभूत झाल्याने नागपूरमध्ये युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेशीमबाग़च्या संघ कार्यालयाच्या मुख्यदारासमोर फटाके फोडले. आरक्षण हिरावून घेऊ पाहणार्यांचा हा पराभव आहे अशी प्रतिक्रया या वेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना-भाजपामधील संबंध ताणले जात असतानाच भविष्यात शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारला पाठिंबा देऊन तारू शकेल अशी चर्चा आतापर्यंत राज्याच्या राजकीय वर्तुळात होती. मात्र बिहारच्या निकालाने भाजपाची केलेली अवस्था लक्षात घेता आता राष्ट्रवादीही भाजपाबरोबर जाईल का हा प्रश्न आहे. त्यापेक्षा कॉंग्रेसबरोबर राहून महाआघाडी म्हणजेच यूपीएमध्येच कायम राहण्याकडे राष्ट्रवादीचा कल असू शकेल. त्यामुळे बिहारच्या निकालाने राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाला नवी कलाटणी दिली आहे असे म्हणावे लागेल.