पुणे : अहमनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर एसटी बस डेपोमधील एका महिला बस कंडक्टरवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बसचा चालक राजू अण्णासाहेब शरणागते याच्यासह परिवहन महामंडळाच्या अधिकारी कामगार संघटनेच्या नेत्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शरणागते यास अटक करण्यात आली असून त्यास २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
याबाबतची माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या श्रीरामपूर आगारात वाहक म्हणून एक महिला सेवेत आहे. या महिलेने मंडळाकडे आपला आगारात लैंगिक छळ होत असल्याची लेखी तक्रार केली होती. त्याची दखल अधिकार्यांनी घेतली नव्हती. नंतर पीडित महिलेने यासंदर्भात पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्याकडे तसेच महिला अत्याचार तक्रार निवारण समितीकडे तक्रार नोंदवली होती. त्याची चौकशी पोलिस उपअधीक्षक राकेश ओला यांनी केली. पीडित महिलेने अत्याचाराची कैफियत त्यांच्यासमोर मांडली. त्यानंतर शनिवारी महिलेची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात घेण्यात आली. फिर्यादीवरून वाहक शरणागते, वाहतूक निरीक्षक अन्सार शेख, पंढरीनाथ गाढे, कामगार नेते देविदास कहाणे यांच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
महामंडळाचे अधिकारी अत्याचार करणा-या वाहकाची ड्युटी त्याच्या सोयीने लावत होते. त्याच्या अत्याचाराला पाठबळ देत होते. त्यांच्या संगणमताने हा प्रकार सुरू होता. पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर अधिकार्यांना मोकळे सोडण्यात आले. संबंधित वाहकाची अकोले आगारात बदली करण्यात आली. कायद्यानुसारची कारवाई करता केवळ चौकशीचा फार्स करण्यात आला. पण महिलेने पाठपुरावा केल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई सुरू केली. पीडित महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत वाहक शरणागते याने आपल्यावर श्रीरामपूर बाभळेश्वर येथे अत्याचार केले. आगारात नोकरीला असताना आपल्याला आरोपी वाहक शरणागते याला बसच्या डेपोमध्ये एकाच वेळी ड्युटी दिली जात असे. त्यात वाहतूक निरीक्षक शेख, गाढे कहाणे यांचा सहभाग होता.