नवी मुंबई : भारत सरकारमार्फत राष्ट्रीय लसीकरण उपक्रमांतर्गत काही निवडक राज्यांमध्ये पंचसंयोजी (पेन्टाव्हॅलंट) लसीकरणाचा कार्यक्रम आरंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही पंचसंयोजी (पेन्टाव्हॅलंट) लस घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हिपॅटायटिस बी आणि ‘हिब’ (हिमोफीलस उन्फ्लुएन्झा टाईप बी) या ५ प्राणघातक रोगांपासून बालकांचे संरक्षण करते.
भारत देशामध्ये डीपीटी (घटसर्प + डांग्या खोकला + धनुर्वात) आणि हिपॅटायटिस बी यांचा समावेश नियमित लसीकरण कार्यक्रमात आधीच करण्यात आला आहे. यामध्ये हिब लस नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. या पाच आजारांविरुध्द एकत्रित लस उपलब्ध करण्यात आली असून यास पेन्टाव्हॅलंट लस असे संबोधण्यात येते. हिब लसीमुळे हिमोफीलस इन्फ्लुएन्झा टाईप बी जीवाणुव्दारे होणार्या न्युमोनिया, मेनिंजायटिस, बॅक्टेरिमिया, एपिग्लोटायटिस, सेप्टिक आर्थ्रायटिस आदींसारख्या गंभीर रोगांना प्रतिबंध करता येऊ शकतो. पेटाव्हॅलंट लस दिल्याने बालकाला वारंवार सुई टोचावी लागत नाही आणि पाच रोगांपासून संरक्षण मिळते.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार २२ नोव्हेंबर रोजी पेन्टाहॅलंट लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत समावेश करणेकरीता शुभारंभ करण्यात आला. या लसीचा शुभारंभ महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, सभागृह नेता जयवंत सुतार, विरोधी पक्ष नेता विजय चौगुले, आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्यक समिती सभापती सौ. पुनम पाटील व उप सभापती गणेश म्हात्रे यांनी विविध कार्यक्षेत्रामध्ये केला.
ही लस १ वर्षापर्यंतच्या बालकांना नवी मुंबई महानगरपालिकेअतर्ंगत विविध ठिकाणी कार्यरत एकुण २१ नागरी आरोग्य केंद्र, सार्वजनिक रुग्णालय नेरुळ, सार्वजनिक रुग्णालय ऐरोली व सार्जनिक रुग्णालय वाशी येथे तसेच नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आयोजित विविध लसीकरण सत्रात मोफत देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.